HINDJAGAR- NEWS – Pune – गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. अलीकडेच अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पंढरपुरच्या पांडुरंगाला साकडं घातलं होतं. अजितला नवीन वर्षातच सुख समृद्धी लाभू दे आणि अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्रित यावे, अशी प्रार्थना त्यांनी पांडुरंगाकडे केली होती.अजित पवारांच्या मातोश्रींनी ही इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट लवकरच एकत्र येतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यापूर्वी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांच्या मातोश्रींनी देखील अशाप्रकारची मागणी केली होती.
यानंतर आता रोहित पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर नक्कीच फायदा होईल, असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
ज्या लोकांनी पवार कुटुंबाला एकत्र पाहिले आहे, अशा अनेक लोकांचे मत आहे की शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं. पवारसाहेब आणि दादा एकत्र आले तर याचा नक्कीच फायदा होईल. पण आम्ही आता संघर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकत्र येण्याबाबतचा निर्णय मोठ्या पवारसाहेबांना आणि दादांना घ्यायचा आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे. त्यामुळे शरद पवार गट अजित पवार गट भविष्यात एकत्र येऊ शकतात, या चर्चेला बळ मिळत आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी पक्षांतर्गत मिळणाऱ्या जबाबदारीवर देखील भाष्य केलं आहे. पक्षात मला छोटी-मोठी जबाबदारी दिली तर मी स्वीकारेल. पण पक्षात १०-१५ वर्षे काम करणारी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असेल तर सर्व पदाधिकारी त्याचं स्वागत करतील, असंही रोहित पवार म्हणाले.
News Repoted By – P. S. SURYANSHI..