हिंदजागर प्रतिनिधी – एकाच विभागामध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अधिकारी नागरिकांची अडवणूक करीत असून, भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केल्यानंतर प्रशासनाने 132 कनिष्ठ अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.
पुढील काही दिवसांतच अधीक्षक आणि लिपिकांच्या देखील बदल्या करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी सांगितले.
माहिती अधिकार कार्यकर्ता श्री.निलेश प्रकाश निकम काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात काम करात आहेत. हे अधिकारी नागरिकांची अडवणूक करीत असून, यामुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे. या अधिकाऱ्यांची तातडीने बदली करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.याची दखल घेत महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने सहा वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या 132 अभियंत्यांच्या बुधवारी तडकाफडकी बदल्या केल्या. यात स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. या बदल्या करताना पूर्वी काम केलेल्या विभागांऐवजी नवीन विभागांमध्येच बदल्या करण्यात आल्या आहेत.
जुन्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये सर्व अभियंत्यांना एकत्रित आणून त्यांच्या मागणी प्राधान्यक्रमानेच बदली करण्यात आली. सर्व अभियंत्यांना बदलीची ऑर्डर दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी दिली.
- श्री.विनोद वाघमारे ( स्थानिक प्रतिनिधी )