हिंदजागर प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता कधीही येण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाची सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपून महिनाभरापेक्षा जास्तचा काळ लोटला आहे.सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो? याच्यावर राज्य सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. एकीकडे या निकालाची प्रतिक्षा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतून बाहेर चालले आहेत. मुख्यमंत्री सोमवारी सातारा दौऱ्यावर आहेत, यानंतर ते त्यांच्या दरे या मूळगावी मुक्कामी असणार आहेत.
सोमवारी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री त्यांच्या गावी पोहोचणार आहेत. या दौऱ्यात एकनाथ शिंदे 2 ते 2 दिवस महाबळेश्वर आणि त्यांच्या दरे या गावात मुक्कामी असणार आहेत. जवळपास 9 महिने सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये शिवसेना कुणाची इथपासून ते आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा, राज्यपालांचे अधिकार, घटनेचं दहावं परिशिष्ठ या मुद्द्यांचा किस पाडला गेला. नोटीस मिळालेल्या 16 आमदारांना सुप्रीम कोर्टानेच अपात्र करावं, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली. तर आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नसून हा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षांनाच आहे, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. ज्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचंही नाव आहे.
- श्री.गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )