हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – तुरुंगामध्ये असताना कैद्यांमध्ये नेहमी हाणामारी होत असते. या हाणामाऱ्यांच्या बातम्या आपण वरचेवर ऐकत असतो. या हाणामारीत काही कैद्यांना किरकोळ मारही लागतो.नंतर पुन्हा असे प्रकार घडू नये म्हणून हे कैदी समोरासमोर येणार नाही याची काळजी घेतली जाते. तुरुंगातील वातावरण चांगलं राहावं असाच प्रयत्न केला जातो. पण गुन्हे करून आत आलेले कैदी शांत बसतील तर ते कैदी कसले? पुण्याच्या येरवडा कारागृहातही कैद्यांचा थरार रंगला. या राड्यात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला केला. रक्तबंबाळ होईपर्यंत या कैद्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.पुण्यातील येरवडा कारागृहात पुन्हा एकदा कैद्यांमध्ये राडा झाला. पुण्यात येरवडा कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्र्याच्या तुकड्याने या कैद्याने दुसऱ्या कैद्यावर वार केल्याची घटना घडली आहे. रोहन हरिदास माने असं या हल्लेखोर कैद्याचं नाव आहे. त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाचा मृत्यू
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील कारागृहात एका आरोपीचा मृत्यू झाला होता. बाळासाहेब खेडकर असं या मृत कैद्याचं नाव होतं. गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे खून प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. खेडकर हा तुरुंगात शिक्षा भोत होता. 10 सप्टेंबर रोजी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे त्याला ससून रुग्णालयात दाखलकरण्यात आले होते.त्याच्यावर उपाचर सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. उरुळी कांचन येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळासाहेब खेडकरसह 10 जणांवर मोक्का लावण्यात आलेला होता. 2021मध्ये ही कारवाई करण्यात आली होती.
असा झाला हल्ला
दोन दिवसांपूर्वी म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. कारागृहातील सर्कल 1 परिसरात ही घटना घडली आहे. या कारागृहात ऋषभ ऊर्फ सनी शेवाळे आणि त्याच्या साथीदारांनाही ठेवण्यात आलं आहे. सनी शेवाळे आणि त्याच्या साथीदारांना लोणी काळभोर पोलिसांनी पकडलं होतं. त्यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.सनी शेवाळे एकटा असल्याची संधी साधून रोहन माने याने सनीवर हल्ला चढवला. रोहनने सनीवर पत्र्याच्या तुकड्याने वार केले. त्यामुळे सनी रक्तबंबाळ झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यामागचं नेमकं कारण समजू शकलं नाही. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
=== गणेश मारुती जोशी ( वार्ताहर )