हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे -आनंद ऋषीजी चौकात (पुणे विद्यापीठ) मेट्रोच्या कामासोबतच उड्डाणपूल उभारण्याच्या कामास गती आली आहे. दुमजली उड्डाणपुलासाठी 32 खांब उभारण्यात येणार आहेत.त्यापैकी 27 खांबांचे काम पूर्ण झाले आहे. येथील खांबावर पहिला पिअर आर्म उभारण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू झाले आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी या चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. हे काम जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना “पुम्टा’च्या बैठकीत देण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेने सेवा वाहिन्या हटवण्याचे काम वेळेत पूर्ण केले नाही. तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, म्हणून पोलिसांनी गणेशखिंड रस्त्यावर बॅरेकेडिंग करण्यास “पीएमआरडीए’ला परवानगी दिली नाही. त्यामुळे चौकातील काम सुरू झाले नव्हते.अखेर या कामाला मुहूर्त मिळाला आहे. गणेशखिंड रस्त्यावर पूल सुरू होणार आहे, त्या ई स्केअर आणि बाणेर रस्ता येथे पूल उतरण्याच्या ठिकाणी पिलर्सचे काम यापूर्वी “पीएमआरडीए’ने हाती घेतलेले काम बहुतांश पूर्ण झाले आहे. मुख्य चौकात काम उड्डाणपुलाचा खांब असल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणून या चौकात एकही खांब न उभारता दोन पिलर्समध्ये 55 मीटर अंतर ठेवण्यात येणार असून, तेथे लोखंडी गर्डर स्पॅन टाकण्यात येणार आहे.
मेट्रोच्या दोन पिलर्स मधील अंतर हे 38 मीटरचे आहे. परंतु चौकात हे अंतर जवळपास दुप्पट ठेवण्यात येणार आहे. परिणामी चौकात पिलर्स उभारण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे 55 मीटर लांबी, सुमारे 18 ते 20 मीटर रुंदीचा हा स्पॅन असणार आहे.
=== गणेश जोशी आणि प्रदीप कांबळे (प्रतिनिधी )