हिंदजगार न्यूज प्रतिनिधी – ‘शेअर मार्केटमध्ये मला खूप तोटा झाला आहे. ज्यांच्याकडून मी पैसे घेतले आहेत ते सर्व जवळचे नातेवाईक व मित्र असल्याने मी त्यांना उत्तर देऊ शकत नाही. मी आत्महत्या करत असून कोणालाही जबाबदार धरु नये’ वगैरे मजकूर असलेली चिठ्ठी लिहून आपली महागडी कार खडकवासला धरणाजवळ सोडून बेपत्ता झालेले शेअर दलाल निरंजन नवीनकुमार शहा (वय-43, रा.आसावरी, नांदेड सिटी) परतले असून गुंतवणूकदारांचे पैसे परत कसे देणार? या चिंतेने निघून गेल्याची माहिती त्यांनी हवेली पोलीस ठाण्यात दिली आहे.
3 ऑक्टोबर रोजी निरंजन शहा वारजे येथील कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले परंतु घरी परतले नाहीत. कुटुंबियांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांची कार खडकवासला धरणाजवळ आढळून आली होती. कारमध्ये शहा यांचे मोबाईल व आत्महत्या करत असल्याबाबत चिठ्ठी सापडली होती. शहा यांच्या कुटुंबीयांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तातडीने अग्निशमन दलाच्या मदतीने खडकवासला धरण परिसरात शोध घेतला परंतु ते आढळून आले नाहीत.शहा बेपत्ता झाल्यापासून शेकडो गुंतवणूकदार हवेली पोलीस ठाण्यात येऊन बसत होते. महत्वाचे म्हणजे ज्या दिवशी निरंजन शहा बेपत्ता झाले होते त्याच दिवशी सकाळी त्यांनी बारामती येथील एका गुंतवणूक दाराकडून तब्बल 81 लाख रुपये घेतल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे निरंजन शहा यांनी आत्महत्या केलेली नसावी ही शंका सुरुवातीपासून पोलीसांच्या मनात होती.हवेली पोलीसांनी त्या अनुषंगाने तपास करुन निरंजन शहा कोणाच्या संपर्कात आहेत व कोठे गेलेले आहेत याबाबत तांत्रिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती.आज सकाळी अचानक निरंजन शहा हे हवेली पोलीस ठाण्यात हजर झाले असून सुमारे साडेचारशे ते पाचशे गुंतवणूक दारांचे पन्नास ते साठ कोटी रुपये देणे असल्याने त्या चिंतेत निघून गेल्याची माहिती त्यांनी हवेली पोलीसांना दिली आहे. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे याबाबत अधिक तपास करत आहेत.
अधिक परताव्याच्या आमिषाने होतोय घात
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा वीस ते तीस टक्के परतावा देतो असे सांगून आत्तापर्यंत अनेक दलालांनी सर्वसामान्यांना गंडा घातलेला आहे. लोकांचा विश्वास बसावा म्हणून हे दलाल गोळा केलेल्या पैशांतूनच सुरुवातीला दरमहा तब्बल वीस ते तीस टक्के परतावा देतात. ज्याला परतावा मिळतो तो आपल्या इतर नातेवाईक व मित्रांना गुंतवणूक करण्याचा सल्ला देतो.अशा प्रकारे शेकडो लोक कष्टाने कमविलेला पैसा या दलालांकडे देतात आणि आयुष्यभराची कमाई अधिक परताव्याच्या हव्यासापोटी गमावून बसतात. खानापूर सारख्या ग्रामीण भागातील नागरिकांचे निरंजन शहा यांच्याकडे काही कोटी रुपये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अनेक पोलीस व इतर विभागातील अधिकाऱ्यांचीही ‘कमाई’ अडकली असून ते उघडपणे पुढे आलेले नाहीत.
=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )