हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – गेल्यावर्षी तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता 400 रुपये द्यावा, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यांचे ट्रक अडविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली.या बैठकीकडे जिह्यातील साखर कारखान्यांच्या अनेक चेअरमननी पाठ फिरविल्याने साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून आले. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी यापुढे होणारे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
राजू शेट्टी म्हणाले, ‘एफआरपी’मध्ये केलेल्या या चुकीच्या वाढीने शेतकऱयांचे नुकसान होत आहे. एक टक्का रिकव्हरी इथेनालसाठी घेतल्यानंतर 307 रुपये शेतकऱयांना दिले जातात. पण यामधून कारखान्यांना जादा पैसे मिळतात. वारंवार आंदोलने करून जर पैसे मिळत नसतील, तर मोठा संघर्ष सुरू होईल. आतापर्यंत राज्यातील 8 साखर कारखान्यांनी ‘एफआरपी’पेक्षा जादा दर दिला आहे. जिह्यातील साखर कारखाने सक्षम असून, ऊसदर नियंत्रणाच्या मान्यतेची तांत्रिक अडचण सांगून दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोपही शेट्टी यांनी केला.
=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )