हिंदजागर न्यूज प्रतिनिधी –टोलच्या मुद्द्यासाठी ९ वर्षानंतर सह्याद्रीवर गेलो, असा राज ठाकरे यांनी सांगितलं. ठाण्यातील 5 प्रवेश ठिकाणी टोल वाढवण्यात आला. त्यानंतर टोलनाक्याचा विषय आल्याचं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं. मंत्री दादा भुसे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती व मागण्यांबाबत राज ठाकरेंनी माध्यमांना माहिती दिली. मंत्री दादा भुसे यांनी मागण्यांबाबत शब्द दिल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, टोलसंदर्भात अनेक सुधारणा झाल्या नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांच्या वक्तव्यानंतर चलबिचल झाली. टोलसंदर्भात सरकारने केलेले करार २०२६ ला संपत आहेत. ठाण्यातील टोलनाक्याच्या पाच ठिकाणी सरकारसह आमच्या (मनसे) पक्षाचे कॅमेरे लागणार आहेत. दरदिवशी वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हे टोल किती दिवस राहणार आहेत? 15 दिवसांत कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसंच टोलनाक्यांवर सुधारणा करण्यात येईल.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
अवजड वाहनांना महिन्याभरात शिस्त लावण्यात येणार असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.एमएसआरडीसीचे 15 टोल नाके बंद करावे, अशी राज ठाकरे यांनी मागणी केली.टोलनाके बंद करण्याबाबत एक महिन्याचा वेळ देण्यात आला.टोलनाक्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना पास देण्यात यावा.यलो लाईनपुढे रांग गेल्यास टोल फ्री म्हणजे टोल घेण्यात येऊ नये, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.टोल नाक्यावर खासगी सुरक्षारक्षक ऐवजी पोलीस तैनात करण्यात येणार.अवजड वाहनांमुळे छोट्या वाहनांना त्रास होत आहे, याकडं राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.टोल भरून चांगले रस्ते मिळत नसतील व दादागिरीची भाषा असेल तर काय उपयोग आहे? शौचालयाच्या सुविधादेखील नाहीत. एक्स्प्रेसवेची कॅग चौकशी करा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.राज्याला महसूल मिळणं गरजेचं आहे. टोल माफी हा विषय नाही. मात्र, टोलचे पैसे किती हे कळायला हवे, असंही ठाकरे म्हणाले.
सौजन्यानं वागण्याची सूचना केली जाईल – मंत्री दादा भुसे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. त्यांच्या मागण्यांबाबत एका महिन्यात निर्णय घेण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. काही मागण्यांवर आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आनंदनगर किंवा ऐरोली यापैकी एकाच ठिकाणी टोलनाका असावा, अशी राज ठाकरे यांनी मागणी केली. याबाबत 15 दिवसांत निर्णय होणार आहे. नागरिकांशी सौजन्यपणानं वागावे, अशी टोलनाका ऑपरेटर चालविणाऱ्यांना सूचना केली जाईल. जे कर्मचारी टोलनाक्यावर आहेत, त्यांची पार्श्वभूमी तपासली जाईल, असंही मंत्री भुसे यांनी सांगितलं.
=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )