हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – येरवडा कारागृहात बंद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले आणि आणि त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भेट नाकारली. अजित पवारांना भेटण्यासाठी रेश्मा भोसले पुण्यातील सर्किट हाऊसला आल्या होत्या.पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यात अनिल भोसले आणि रेश्मा भोसले हे आरोपी आहेत. 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारल्यानंतर रेश्मा भोसले भाजपच्या पाठिंब्यावर नगरसेविका बनल्या. मात्र तेव्हापासून अजित पवार आणि भोसले कुटुंबात वितुष्ट आले होते. 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अनिल भोसलेंना बॅंक घोटाळ्यात अटक करण्यात आली तर रेश्मा भोसले यांना जामीन मिळाला. मात्र आजारपणाचे कारण देऊन अनिल भोसले ससून रुग्णालयात भरती होते. मात्र ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर कैद्यांच्या 16 नंबर वॉर्डमधून अनेक कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात पाठवण्यात आले. त्यामध्ये माजी आमदार अनिल भोसले यांचाही समावेश आहे.
अनिल भोसले हे बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात आणि ठेवीदारांचे पैसे बुडवल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. मात्र गेल्या 130 दिवसांपासून त्यांचा मुक्काम पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये होते. हे दोघं नेमकं कशासाठी अजित पवारांची भेट घेणार होते, या संदर्भात कोणतीही माहिती अद्याप मिळाली नाही आहे मात्र अजित पवारांनी भोसले कुटुंबांची भेट नाकारली .
=== गणेश मारुती जोशी ( प्रतिनिधी )