हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – माझ्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. कोणीही नाराज व्हायचे कारण नाही. पालकमंत्री पद देणे, ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे.बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी आहे. यावेळी जिंकलो नाही तर पुन्हा कधीच जिंकणार नाही. त्यामुळे मतभेद, वाद बाजूला ठेवून कामाला लागा, अशासूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी धायरी बारामती लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुक्ताई गार्डन येथे झालेल्या या बैठकीत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. ते म्हणाले, मी पालकमंत्री नाही, म्हणून कार्यकर्ते पदाधिकारी, नाराजी व्यक्त करत आहेत. पालकमंत्री पद देणे हे मोठ्या कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे. ही तडजोड महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा निवडून आणण्यासाठी व नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आहे. त्यामुळे वरीष्ठ नेतृत्वाच्या निर्णयाचा सर्वांनी आदर केला पाहिजे.
माझे पालकमंत्रीपद गेले तरी व्हीआयपी सर्कीट हाऊसमधील माझी दोन्ही कार्यालये सुरूच राहणार आहे, मी पूर्वीसारखाच पुण्यात काम करणार आहे, पूर्वीसारखाच मी आपणा सर्वांना भेटणार आहे, पूर्वीसारखाच निधी मिळणार आहे, त्यामुळे कोणताही विचार न करता काम करा. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकडे असणारे हर्षवर्धन पाटील व त्यांची कन्या आज इकडे आपल्यासोबत आहेत, बाबा जाधवराव त्यावेळी आरदाच इकडे होता, आता तो ही पूर्ण इकडे आहे. इतर गोष्टीही आपल्या बाजूने आहेत, इतर गोष्टीही जूळून आल्या आहेत.त्यामुळे यावेळी बारामती लोकसभा मतदार संघात आपलाच विजय झाला पाहिजे. आता विजय मिळाला नाही तर पुन्हा कधीच विजय मिळणार नाही. त्यामुळे माझा फोटो लहान झाला, तुझा फोटो मोठा होता, यावरून वाद घालत न बसता, आपापसातील हेवेदावे व मतभेद संपवून कामाला लागा, रात्रीच्या अंधारात विरोधकांना भेटने बंद करा, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी केल्या.
बावनकुळे म्हणाले, अमेटी व बारामती लोकसभा मतदार संघ भाजपसाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती लोकसभा भाजपला जिंकायचीच आहे. बारामती जिंकल्यानंतर त्याचे सर्व श्रेय तुम्हासर्वांना असेल. त्यासाठी तुम्ही कामाला लागा. जे कोणी मन की बात ऐकण्यासाठी येणार नाहीत त्यांना पदावरून हटवले जाईल.भोरमध्ये मन की बात ऐकण्यासाठी अवघे १५ जण होते. मन की बात ऐकण्यासाठी आलाच पाहिजे आणि त्याचे फोटो अपलोड झाले पाहिजे.
===गणेश मारुती जोशी (प्रतिनिधी )