हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – ससून रुग्णालयातून ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे पलायन प्रकरण, उपचाराच्या नावाखाली महिनोनमहिने रुग्णालयात ठाण मांडून बसलेले हायप्रोफाइल कैदी, रुग्णालयातील अपुरा औषधपुरवठा आणि उपचार मिळण्यास होणारा उशीर या सर्व प्रकारांमुळे सध्या ससून रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ससून रुग्णालयाचा शुक्रवारी आढावा घेतला. यावेळी पवार यांनी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची झाडाझडती घेतली.
“नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाळ्यात म्हणून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देतो. रुग्णालयात अत्याधुनिक उपचाराची यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. मात्र तुमच्याकडून रुग्णांना सोयीसुविधा देण्यात निष्काळजीपणा होत आहे. सर्वसामान्य रुग्णाला सुविधांचा लाभ द्यावा; या संदर्भात दुर्लक्ष झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा शब्दांत पवार यांनी खडेबोल सुनावले.
यावेळी डॉ. ठाकूर यांनी ससून रुग्णालयातील सुविधांची माहिती दिली. रुग्णालयातील उपचार सुविधेत वाढ करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. येमपल्ले आणि डॉ. हंकारे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांची माहिती दिली.डॉ. ठाकूर यांनी काढला पळया बैठकीनंतर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्याबाबत विचारले असता डॉ. ठाकूर यांनी बोलण्यास नकार देत गाडीत बसून पळ काढला.
बैठकीस आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे, बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.
== गणेश मारुती जोशी ( स्थानिक प्रतिनिधी )