हिंद जागर न्यूज पुणे इनसाईड स्टोरी – पिंपरी-चिंचवड भाजपाची धुरा शंकर जगताप यांच्या हातात आली आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील अनेक अतिमहत्त्वाकांक्षी नेत्यांची राजकीय गणिते चुकली. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जगताप कुटुंबाला राजकीयदृष्टया उद्धवस्थ करण्याचे कट-कारस्थान रचले जात आहे.परिणामी, जगताप कुटुंबासाठी सध्याचा काळ कसोटीचा आहे.चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड मतदार संघात २० वर्षे निर्विवाद सत्ता राखली. आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. तत्पूर्वीच त्यांनी ‘विधानसभा निवडणूक प्रमुख’ म्हणून शंकर जगताप यांना मतदार संघात सक्रीय केले. पक्षाच्या बैठका, राजकीय निर्णय आणि विकासकामांबाबत शंकर यांचा शब्द अंतिम होता. त्यामुळे शंकर भविष्यातील स्पर्धक होणार ही भिती काही महत्त्वाकांक्षी लोकांना सतावत होती. या राजकीय असुरक्षेतूनच लक्ष्मण जगताप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाही शंकर जगताप यांची ‘राजकीय कोंडी’ कशी करता येईल? याची रणनिती आखली जात होती.
लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर जानेवारी- २०२३ मध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यावेळीच दिवंगत जगताप यांचा राजकीय वारसदार कोण? असा विचार हेतुपरस्सर पुढे आणण्यात आला. वास्तविक, शंकर जगताप यांना निवडणूक प्रमुख करुन आणि निर्णय स्वातंत्र्य देवून दिवंगत जगताप यांनी शंकर यांच्याच खांद्यावर धुरा दिली होती. मात्र, ”भाजपाची उमेदवारी कोणाला? पत्नी अश्विनी जगताप की बंधू शंकर जगताप यांना” असे दोन परस्परविरोधी मतप्रवाह जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आले. ”राजा का बेटा राजा नहीं बनेंगा…” ही राजकीय पुडीही सोडण्यात आली. त्यावर प्रसारमाध्यमांमध्ये नियोजनबद्ध चर्चा घडवून आणण्यात आली. ”अश्विनीताई उमेदवार असतील…तर आम्ही निवडणूक लढवणार नाही…” असे जाहीरपणे सांगणारे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि लढलेसुद्धा. नियोजनाप्रमाणे शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा पत्ता कट झाला. हा शंकर जगताप यांच्यासह जगताप कुटुंबियांविरोधातील सामूहिक कट- कारस्थानाचा पहिला विजय होता. ही निवडणूक जगताप कुटुंबियांसाठी निश्चितच सोपी नव्हती. कारण, दिवंगत जगताप यांच्या मृत्यूमुळे असलेल्या सहानुभूतीचे वातावरण संपवण्यात पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरील विरोधक यशस्वी झाले होते.शहर आणि राज्य पातळीवर अनेक राजकीय खलबतांनंतर भाजपाने अश्विनी जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. निवडणुकीची जबाबदारी शंकर जगताप यांच्यावर सोपवली. राज्यातील तत्कालीन राजकीय परिस्थिती पाहता कसबा निवडणुकीत भाजपाला जागा गमवावी लागली. तीच परिस्थिती चिंचवडमध्ये झाली असती, कारण उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वी पुणे-मुंबई वारी करणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी नेत्यांनी निवडणूक प्रचारात तटस्थ भूमिका घेतली. ‘सीट काढायची आहे’ म्हणून जगताप कुटुंबियांनी जुळवून घेतले. शंकर जगताप यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांचे चेहरे उघडे पडले. ज्यांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध केला. त्यांच्याच प्रभागांमध्ये अश्विनी जगताप यांना मतदान कमी आहे. ही निवडणूक शंकर जगताप यांनी न लढता जिंकली होती, ही वस्तुस्थिती आहे.
चिंचवडच्या पोटनिवडणुकीत शंकर जगताप यांनी आपली क्षमता सिद्ध केली. दरम्यान, भाजपाचे पूर्व शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे नवा शहराध्यक्ष कोण? अशी चर्चा जोर धरू लागली. पुन्हा जगताप विरोधी फळी जागी झाली. ”एकाच घरात दोन पदे नको..”, ”पक्षात दुफळी माजली जाईल…”अशी वातावरण निर्मिती सुरू झाली. प्रसारमाध्यमांमध्ये नियोजनबद्ध चर्चा घडवून आणण्यात आली. ज्या नेत्यांनी पोटनिवडणुकीत शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्याच नेत्यांनी शहराध्यक्षपदासाठीही विरोधाची धार कायम ठेवली. मात्र, आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाची ताकद कायम ठेवायची असेल, तर ”मॅन, मसल आणि मनी” अशी तिहेरी ‘पॉवर’ असलेला तगडा नेता भाजपाला शहराध्यक्ष म्हणून हवा आहे. त्यासाठी शंकर जगताप यांच्याशिवाय पर्याय नाही. कारण, दिवंगत लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे ही एक शहराध्यक्षपदाची ‘ पॉलिटीकल लीगसी’ ठरली आहे. ती कायम ठेवता आली पाहिजे. लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीशी दोन हात केले आणि भाजपाकडे सत्ता मिळवली. महेश लांडगे यांनी पक्ष विरोधात असतानाही शहराध्यक्ष म्हणून नेटाने कारभार केला. आता त्यांच्यानंतर सक्षम नेता शंकर जगताप आहे, असा ‘रिपोर्ट’ भाजपाच्या गुप्तचर यंत्रणेने पक्षनेतृत्त्वाला पोहोचवला. परिणामी, शहर कार्यकारिणी जाहीर करताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शंकर जगताप यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. हा जगताप विरोधकांचा पहिला पराभव ठरला.
शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरून शहर भाजपात दुफळी माजवण्यात आली. पक्षनेतृत्त्वाकडे तक्रारी, निवेदने आणि बैठका झाल्या. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘किसी की एक ना सुनी’. शंकर जगताप यांचा विरोध करणाऱ्यांची अस्वस्थता कमालीची वाढली. प्रसारमाध्यमांमध्ये पुन्हा त्या चर्चा घडवून आणण्यात आल्या. शहराध्यक्ष झाल्यानंतर शंकर जगताप यांनी पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम घेतला. मध्यप्रदेश येथील प्रसिद्ध शिव महापुराण कथा वाचक प्रदीप मिश्रा यांचा ”अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचन सोहळा” सांगवी येथील पीडब्यूडी मैदानावर झाला. सात दिवस झालेल्या या सोहळ्याला सुमारे १८ लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली. राज्यातील अध्यात्मिक क्षेत्रात हा सोहळा ‘रेकॉर्ड ब्रेक’ ठरला. महाराष्ट्रातील सर्वात मोठा शिव महापुराण कथा सोहळा म्हणून पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात या कार्यक्रमाची चर्चा झाली. देव-देश आणि धर्म याबाबत कमालीची संवेदनशीलता असलेल्या भाजपाच्या गुप्तचर यंत्रणेची नजर या कार्यक्रमावर होती. अपेक्षेप्रमाणे सर्व ‘रिपोर्टिंग’ पक्षनेतृत्त्वाकडे झाले. शंकर जगताप यांची ‘लाईन ऑफ ॲक्शन’ योग्य आहे, ही बाब अधोरेखित झाली. त्यामुळे २०२४ साठी इच्छुक असलेल्या महत्त्वाकांक्षी नेत्यांच्या पोटात गोळा आला होता. त्यानंतर शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये जगताप यांनी ‘अल्पसंतुष्टांना दोन हात लांब’ ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि भाजपाला संघटनात्मक बळ देण्यासाठी तयारी सुरू केली. ”संघटनेत एकही पद नाही, पक्षश्रेष्ठींकडे दाद मिळत नाही…” अशी स्थिती झाल्यामुळे शंकर जगताप विरोधी गट आणखी सक्रीय झाला.
”महत्त्वाच्या पदाअभावी संघटनेत बोलता येईना. शंकर जगताप यांना विरोध करता येईना…” अशी अडचण झाल्यामुळे पुन्हा अल्पसंतुष्ट नेत्यांनी आमदार अश्विनी जगताप यांना ‘ढाल’ करायला सुरूवात केली. पक्ष संघटनेच्या कार्यक्रमातील उणीवा काढणे आणि किरकोळ बाबींचा ‘इश्यू’ करीत आमदार जगताप यांना डावलले जाते आहे, अशी वातावरण निर्मिती सुरू झाली. ”संघटना कामच करीत नाही. पक्षाचे निरोपच मिळत नाहीत. आम्ही काम काय करायचे आणि कसे करायचे काहीच सांगितले जात नाही. आम्हाला डावलले जाते…” अशी अनेक तक्रारींची जंत्री निर्माण करण्यात आली आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘कानाला लागली’. पण, भाजपा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात तो त्यांच्या त्रयस्थ गुप्तचर यंत्रणेच्या ‘रिपोर्ट’नुसार आणि शंकर जगताप यांचा ‘रिपोर्ट’ चुकीचा नाही. किंबहुना, ओबीसी समाजाला पक्ष संघटनेमध्ये सर्वाधिक संधी दिल्याबद्दल स्वत: बावनकुळे समाधानी आहेत, अशी स्थिती आहे. ‘घर चलो अभियान’च्या निमित्ताने बावनुकुळे यांनी पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. या दौऱ्याचे शंकर जगताप यांनी शहराध्यक्ष या नात्याचे अचूक नियोजन केले. मात्र, जगताप यांना अपयशी ठरवण्यासाठी अल्पसंतुष्ट नेत्यांची यंत्रणा कामाला लागली. परिणामी, दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेपासून कार्यक्रम स्थळापर्यंत जिथे संधी मिळेल,तिथे वादंग निर्माण करण्याचे ‘कारस्थान’ रचण्यात आले होते. विशेष म्हणजे, बावनकुळे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्याचीची तयारी होती, असे समजले. दुसरीकडे, २०२४ साठी इच्छुक असलेल्या एका नेत्याने बावनकुळे उतरलेल्या हॉटेलमध्ये धडक दिली. त्याठिकाणी शंकर जगताप यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचायला सुरूवात केली. पण, ‘रिपोर्ट’ चांगले असल्यामुळे बावनकुळे यांनी शंकर जगताप यांची पाठराखण केली. किंबहुना, ”तुम्ही मला काही सांगू नका. आधी पक्षाचे काम करा…” अशा शब्दांत संबंधित नेत्याला फटकारले. त्यामुळेच पुढे रावेत येथील ‘वॉरिअर्स संवाद’ कार्यक्रमात क्षुल्लक कारणावरुन राडा नाट्य घडवण्यात आले आणि ‘रामायण घडले’. या सर्व घडामोडींमध्ये जगताप कुटुंब केंद्र स्थानी राहिले आहे. त्यामुळे आगामी काळ हा जगताप कुटुंबियांसाठी कसोटीचा ठरणार आहे.
== गणेश मारुती जोशी ( इनसाईड स्टोरी कव्हरेज)