हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – सध्या राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. अलीकडेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. सत्तेत नवा वाटेकरी आल्याने शिंदे गट आणि भाजपाच्या आमदारांची निराशा झाली आहे.मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून तिन्ही गटात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाला. दरम्यान, तिन्ही पक्षातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा होती.या सर्व घडामोडींनंतर शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मी गिरीश महाजनांपेक्षा मोठा आमदार आहे. पण त्यांना नेहमी मोठी खाती मिळतात, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. विशेष म्हणजे व्यासपीठावर स्वत: गिरीश महाजन उपस्थितीत असताना गुलाबराव पाटील यांनी विनोदी शैलीत ही फटकेबाजी केली. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या आहेत.
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात गुलाबराव पाटील विनोदी शैलीत म्हणाले, “मी गिरीश महाजनांपेक्षा फार मोठा आमदार आहे. ते मोठ्या खात्यांचे मंत्री असतील, याचं मला काय देणं-घेणं नाही. त्यांना सगळी मोठी खाती मिळतात. पण मी ज्या मतदारसंघात राहतो, मतदारसंघाचा मी आमदार आहे, तिथे कवयित्री बहिणाबाई विद्यापीठ आहे. तिथे अशोक जैन यांचे दोन कारखाने आहेत. केशव प्रतिष्ठानही त्याच मतदारसंघात आहे.”
==== प्रदीप कांबळे ( स्थानिक प्रतिनिधी )