हिंदूजागर न्यूज प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील माजी सत्तारूढ पक्षनेते आणि भाजपचे प्रवक्ते एकनाथ पवार बुधवारी दुपारी १२ वाजता शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.बुधवारी (२५ ऑक्टोबर) त्यांच्या वाढदिनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवबंधन बांधणार आहेत.पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला खिंडार पडले असून, निष्ठावंत गटाचे नेते अशी ओळख असलेल्या एकनाथ पवार यांच्या सेना प्रवेशाने येत्या काळात भाजपला मोठा फटका बसणार आहे. त्यांच्या सेना प्रवेशाने पिंपरी- चिंचवड महापालिकेमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
मी मराठा योद्धा मनोजजी जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून, मराठा आरक्षणास पाठिंबा देत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या गटात उद्या माझ्या जन्मदिनी दुपारी ठीक १२ वाजता पक्षप्रवेश करणार असल्याची पोस्ट करीत, एकनाथ पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले.एकनाथ पवार यांनी रविवारी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पिंपरी -चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसल होता. मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सगळ्या पदांचा राजीनामा देत आहे , अशी भूमिका पवार यांनी जाहीर केली होती. पिंपरी- चिंचवडच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये एकनाथ पवार यांचे योगदान मोठे आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, पक्षप्रवक्ते अशी विविध पदे भूषविली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे सहकारी आहेत. २०१२ मध्ये भाजप शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्याचबरोबर २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी पिंपरीमध्ये सभा घेतली होती. मात्र भाजप, शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी लढत झाल्याने अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.भाजपतील अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला. भोसरी विधानसभेमध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे असल्याने आगामी काळात संधी नसल्याने गेल्या काही वर्षांपासून ते नांदेडमधील रोहा कंधार विधानसभा मतदारसंघामधून संघटना बांधण्याचे काम करत होते. त्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची अर्थात उद्धव ठाकरे आणि मतदार आहेत. त्यामुळे एकनाथ पवार यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्या सेना प्रवेशाने पिंपरी- चिंचवड महापालिकेमधील राजकीय समीकरणे येत्या काळात बदलणार आहेत.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज पुणे )