हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि विचित्र मागण्यांमुळे कायमच चर्चेत राहणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. आज पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे यला मिळत आहे. वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या दोघांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली होती. हे दोघेही मुख्य याचिकाकर्ते होते. याच याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द झाले होते. त्यामुळे याचाच राग मनात ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परळ येथील क्रिस्टल टॉवरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. याच टॉवरच्या बाहेर त्यांची गाडी उभी असताना आज सकाळी साधारणतः 6.30 वाजताच्या सुमारास काही तरुण तिथे आले आणि त्यांनी गाडीची तोडफोड केली. यावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी तत्काळ तीन तरुणांना ताब्यात घेतले. पण तोडफोड करणाऱ्या तरुणांकडून ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या. ज्यामुळे हे तरुण मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. ज्या तीन तरुणांना पोलिसांनी गाडीची तोडफोड केल्यानंतर ताब्यात घेतले आहे, ते तरुण छत्रपती संभाजीनगर येथील असल्याचे सांगण्यात आले आहे.ज्यावेळी हे तिन्ही तरुण गुणत्न सदावर्ते यांच्या वाहनाची तोडफोड करण्यासाठी आले तेव्हा त्यांच्या हातात काठ्या होत्या. तर यांतील एक तरुण हा गेवराई येथील सरपंच असून त्याचे नाव मंगेश साबळे असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात येत आहे. ज्यामध्ये सदावर्ते यांच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आल्याचे यला मिळत आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून वारंवार मराठा आरक्षणाच्या विरोधात विधाने करण्यात येत असल्याने आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या तरुणांकडून अशा पद्धतीचे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मात्र, हा हल्ला मराठा समाजाच्या तरुणांनी केला नसल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )