हिंदजागर न्यूज प्रतिनिधी –सकल मराठा समाज छत्रपती शिवाजीनगरमनोजदादा जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात छत्रपती शिवाजीनगर मधील सकल मराठा समाजाच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.गेल्या ४० वर्षांपासून मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा सुरु आहे. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे यासाठीच्या लढ्यात अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिले. जगाचे लक्ष वेधून घेतले असे लाखो मराठा बांधवांचे शांतीपूर्ण मार्गाचे एकूण ५७ मोर्चे राज्यात निघाले आणि आता मनोज जरांगे-पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वसामान्य गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुर्देवाने जरांगे-पाटील यांनी सुरु केलेल्या शांततापूर्ण आंदोलनामध्ये लाठीचार्ज करत माय – माउलींची डोकी रक्तबंबाळ करून हे आंदोलन मोडून काढण्यासाठीची परिस्थिती निर्माण केल्याने मराठा समाजामध्ये तीव्र असंतोष आहेच.यानंतर शासनाने मनोज जरांगे-पाटील यांच्याकडून आरक्षणाच्या निर्णयासाठी ४० दिवसांचा कालावधी घेतला होता.
निर्णय प्रक्रियेतील दिरंगाईमुळे या कालावधीत शासन आरक्षणाचा निर्णय घेणेस असमर्थ ठरले. याची जाणिव शासनाला हा कालावधी मागून घेताना झाली नव्हती का ? असा प्रश्न मराठा समाज सरकारला करत आहे. जरांगे-पाटील यांनी पुन्हा अन्न – पाणी – उपचार बंद करून आंदोलन सुरु केले. या सगळ्यामध्ये त्यांच्या प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे व याची मोठी काळजी सर्वांनाच वाटत आहे.मनोज जरांगे-पाटील यांच्या तब्येतीला कोणताही धोका पोहोचू नये म्हणून त्यांच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून मराठा आरक्षणसंबंधी कोणतीही फसवणूक न करता सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एकमताने निर्णय घ्यावा, तसेच मराठा आंदोलनाचा उद्रेक होणार नाही याची सर्वतोपरी काळजी सरकारने घ्यावी अन्यथा होणाऱ्या सर्व घटनांना महाराष्ट्र सरकार जवाबदार राहील. अशी प्रतिक्रिया यावेळी दत्ता बहिरट यांनी दिली .