हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी डबल मोक्का लावण्यात आलेल्या नाना गायकवाड याच्यावर महापालिकेनेच गुन्हा दाखल केला आहे.औंध येथील एका इमारतीचे बनावट भोगवटा प्रमाणपत्र तयार करुन त्याचे स्टेट बँक ऑफ इंडियासोबत भाडेकरार करुन फसवणूक केली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ डिसेंबर २०२० पासून आजपर्यंत घडला आहे. डबल मोक्कामध्ये नानासाहेब गायकवाड सध्या कारागृहात आहे.
नानासाहेब शंकरराव गायकवाड (रा. एनएसजी हाऊस, बाणेर रोड, पुणे) आणि भोगवटा प्रमाणपत्र तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर आयपीसी 420, 467, 468, 471, 120ब, 34 सह नोंदणी अधिनियम 82, 83 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेच्या इमारत निरीक्षक कामिनी सुरेश घोलप (वय-35 रा. जांभुळवाडी, कात्रज) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.30) फिर्याद दिली आहे. हा प्रकार सर्वे नंबर 127/1 ए ते 1 इ, प्लॉट नंबर 108 औंध, या ठिकाणी घडला.