हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये राडा झाला आहे. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असल्याची घटना समोर आली आहे.यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआय या संघटनेकडून विद्यापीठात संघटनेी सदस्य नोंदणी सुरू होती. त्यावेळी अभाविप आणि एसएफआयच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरु झाला. अभाविपने आमच्या सदस्य नोंदणीत अडथळा आणल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. तर, अभाविपने एसएफआयचे कार्यकर्ते बळजबरीने सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप केला. या हाणामारीत दोन्ही बाजुचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. पुणे विद्यापीठातील हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनुसार, एसएफआयच्या कार्यकर्त्याला अभाविपचे कार्यकर्त्यांनी खाली पाडून मारताना दिसत आहेत. तर, एका अभाविपच्या कार्यकर्त्याला एसएफआयचे कार्यकर्ते काठीने मारहाण करताना दिसत आहेत.
दोन्ही संघटनांमध्ये झालेल्या राड्यामुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. काही वर्षांपूर्वीदेखील एसएफआय आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. एका आमदाराने भारतीय जवानांच्या पत्नीबाबत काढलेल्या अपमानास्पद वक्तव्याविरोधात एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी निषेध करणारी पोस्टर लावली होती. ही पोस्टर लावताना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी एसएफआयच्या कार्यकर्त्यांना अटकाव करून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे )