हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची विद्यापीठाने गांभीर्याने दखल घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मुलांची आणि मुलींची स्वतंत्र वसतिगृहे आहेत.त्यातील मुलांच्या वसतिगृहाच्या भिंतीवर पंतप्रधानांविषयी इंग्रजी भाषेत आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आल्याचा प्रकार गुरुवारी निदर्शनास आला.त्यामुळे अशा आक्षेपार्ह शब्दांत पंतप्रधानांबद्दल विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या भिंतीवर कोणी आणि का लिहिले असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या प्रकाराचा निषेध करून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशमंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह पद्धतीने लिहिण्यात आले आहे. याबाबत विद्यापीठाने तत्काळ पोलिसांकडे तक्रार देऊन संबंधितांना अटक करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
असा प्रकार करणाऱ्या समाजकंटकांचा विद्यापीठ निषेध करत आहे. संबंधितांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
— गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्यूज, पुणे )