हिंदजागर नीज प्रतिनिधी – भरधाव कारने तीन मुलींना धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी एरंडवणे भागात कर्नाटक शाळेजवळ घडली. या अपघातात तिघी मुली जखमी झाल्या असून त्यातील एकीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.रसिका धम्म, हर्षदा सावंत आणि महिमा कटारिया अशी अपघातात जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत. या अपघातात रसिका हिच्या जबड्याला गंभीर इजा झाली असून, तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी, कारचालक वर्षा अमित मराठे (वय ४७, रा. कुमार शांतिनिकेतन, पाषाण) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठे या कोथरूडमधील निंबाळकर बागेकडून एरंडवणे भागातील गणेशनगरकडे निघाल्या होत्या. स्वप्नशिल्प सोसायटी येथे वळण घेत असताना, त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पदपथावर चढली. त्यामुळे पदपथावरून जात असलेल्या मुलींना कारची धडक बसली.धडकेमुळे दोन मुली या बाजूला फेकल्या गेल्या. तर एक मुलगी कारच्या चाकाखाली सापडली. त्यामुळे ती गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघातानंतर नागरिकांनी तिघींना तातडीने एरंडवणे भागातील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताचा तपास अलंकार पोलिस करीत आहेत.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज,पुणे)