हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे नेहमीच सामाजिक कार्यात आघाडीवर असतात. कुठे काही घटना घडली किंवा गरजू व्यक्तीला मदत लागली, तर वसंत मोरे धावून जातात.सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकांच्या संपर्कात असतात. अशातच वसंत मोरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी पुणे पोलिसांना इशारा दिला आहे. आमची दिवाळी नीट झाली नाही, तर तुमचा रोज शिमगा होईल, असा इशारा वसंत मोरे यांनी पुणे पोलिसांना दिला आहे. दिवाळीचा सण तोंडावर असताना पुण्यात होतकरू तरुणांनी फटाके विक्रीचे स्टॉल लावले आहेत. या स्टॉलवर येऊन पुणे पोलिसांसह महापालिकेचे कर्मचारी पैसे मागत असल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला आहे.
दिवाळीतले चार दिवस आमची तरुण पोरं रस्त्याच्या कडेला कोणाला अडचण होणार नाही याची काळजी घेऊन फटाकड्याचे स्टॉल लावून बसलेले आहेत. यासाठी त्यांनी व्याजाने पैसे आणले आहेत. पण मी मागच्या दोन दिवसांपासून रोज ऐकतोय, अतिक्रमणवाले एवढे मागतात… पोलीस तेवढे मागतात… ट्रॅफिक वाले एवढे मागतात…अरे आमची पोर फटाकडे विकत आहेत गांजा नाही, असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
आज तर एका पोलिस महाशयांनी कमालच केली… एक पोरग त्यांना म्हटलं वसंत (तात्या) मोरे संग बोला… तर साहेब बोलले की ही त्यांची हद्द आहे का ? माझी हद्द ठरवायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? तेव्हा साहेब हात जोडून विनंती आहे… पोरांना धंदे करू द्या.., अशी विनंती वसंत मोरे यांनी केली आहे.त्यांची दिवाळी ४ दिवसांचीच आहे… तुमची दिवाळी उरलेले ३६१ दिवस चालते… आमची दिवाळी नीट झाली नाही तर तुमचा रोज शिमगा होईल… तेव्हा उगाच हद्दीच्या भानगडीत पडू नका… नाहीतर एका दिवसात सगळे लाईव्ह घेऊन कोणी किती घेतले ते जाहीरपणे सांगावे लागेल… असा इशाही वसंत मोरे यांनी पोलिसांना दिला आहे.
— गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्यूज, पुणे )