हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – राज्य सरकारने नेमलेल्या समितीने शासनापुढे अहवाल सादर केला आहे. या प्रकरणात ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर आणि अस्थिव्यंगोपचार पथक प्रमुख डॉ. देवकाते दोषी आढळले आहेत.त्यामुळे राज्य सरकारने या दोन्ही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टरांचं निलंबन केलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजीव ठाकूर यांची आता विभागीय समिती मार्फत चौकशी होणार आहे. विशेष म्हणजे संजीव ठाकूर यांची आजच अधिष्ठता पदावरुन उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
संजीव ठाकूर यांच्यापूर्वी डॉ.विनायक काळे हे ससून रुग्णालयाचे डीन होते. काळे यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची ससून रुग्णालयाच्या महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाविरोधात काळे यांनी मॅट कोर्टात धाव घेतली होती. मॅट कोर्टाने संजीव ठाकूर यांची नियुक्ती रद्द केली. त्यानंतर आता हायकोर्टानेदेखील तसाच निर्णय दिला आहे. त्यामुळे संजीव ठाकूर यांचं डीन पदाची खुर्ची कायदेशीररित्या आधीच गेलीय. त्यानंतर आता त्यांचं सरकारकडून निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे ललित पाटील याला पुणे पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर तो जेलमध्ये कैद होता. तो येरवडा कारागृहात गेल्या तीन वर्षांपासून कैद होता. पण तीन वर्षांच्या या कालावधीतील नऊ महिने तो ससून रुग्णालयात उपचाराच्या निमित्ताने दाखल होता. तो नऊ महिन्यांनी अचानक ससून रुग्णालयातून फरार झाला. त्याच्या फरार होण्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले होते. पोलिसांनी प्रचंड तपास करुन त्याला 15 दिवसांनी अटक केली. या प्रकरणावरुन राजकीय वातावरण देखील तापलं आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर या प्रकरणावर सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत.