हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – दिवाळी म्हणजे फराळांचा सण तसेच गप्पांच्या मैफिलीचाही. नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेटण्याचे हक्काचे दिवस. राजकीय स्तरावरही भेटीगाठीं यानिमित्ताने होत असतात. पण सध्या झालेल्या भेटीगाठींनी मात्र अख्ख्या महाराष्ट्राला कोड्यात टाकलं आहे.ही भेट आहे बहुचर्चित पवार कुटुंबियांची. अजिततदादांनी भाजपासोबत वेगळी चूल मांडली आणि इतकी वर्षं एकसंध राहिलेले पवार कुटुंबिय आता वेगळे होणार की काय अशी शंका येऊ लागली. पण सुप्रिया सुळे यांनी नुकतेच शेअर केलेल्या फोटोंनी मात्र नक्की चाललं आहे तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
सुप्रिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेयर केले आहेत. यामध्ये पवार कुटुंबियांसोबत अजित पवार आणि सुनेत्रा पवारही दिसत आहेत. Blessed! Embracing the beauty of our traditions with pride! हे कॅप्शन देत त्यांनी हे फोटो शेअर केले आहेत. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत उपमुख्यमंत्री अजित पवार हे गोविंदबागेतील दिवाळी पाडव्याला अनुपस्थित राहिले होते. पण शरद पवार यांच्याकडे आयोजित स्नेहभोजनाला ते कुटुंबासह उपस्थित राहिले. एकूण काय राष्ट्रवादीतील फूटीनंतर शरद पवार व अजित पवार यांच्यात नेमके काय चालले आहे, याचा अंदाज येणे अशक्य झाले आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )