हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींच्या आरोग्याची अगोदरच हेळसांड होत असताना, आता सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याकडे दुर्लक्ष करून महापालिका प्रशासन विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे.सॅनिटरी नॅपकिन पुरवठ्याच्या टेंडर प्रक्रियेवरील आरोप-प्रत्यारोप, अहवाल सादरीकरण अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सॅनिटरी नॅपकिन मिळण्यास आता आणखी विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थिनींना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना महापालिकेकडून दरवर्षी मोफत सॅनिटरी नॅपकिन पुरविले जातात. कोरोना कालावधीत शाळा बंद राहिल्याने या काळात विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली नव्हती. कोरोनानंतर शाळा नियमित सुरू झाल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागाने सॅनिटरी नॅपकिन पुरवठ्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याची आवश्यकता असताना त्याकडे दुर्लक्ष केले.त्यावरून टीका झाल्यानंतर शिक्षण विभागाने २८ हजार विद्यार्थिनींसाठी महापालिकेच्या भांडार विभागाकडे सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची मागणी केली होती. त्यानुसार भांडार विभागाने मागील महिन्यात सॅनिटरी नॅपकिन पुरवठा करण्याच्या टेंडर प्रक्रियेला सुरवात केली होती.
संबंधित टेंडर प्रक्रियेमध्ये सहा जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी शासनाच्या अटी व शर्तींचे पालन करून कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या दोन जणांचे अर्ज पात्र ठरविण्यात आले, तर अपूर्ण कागदपत्रांमुळे चार जणांचे अर्ज बाद ठरविले होते.दरम्यान, टेंडर प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या व्यक्तीने टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी आदेश दिल्यानंतर टेंडर प्रक्रियेसंबंधीचा अहवाल भांडार विभागाने आयुक्तांकडे पाठविला आहे. तर दुसरीकडे टेंडर प्रक्रियेत केंद्र सरकारच्या केंद्रीय भांडार विभागाकडून सर्वात कमी दराचे टेंडर सादर झाले आहे.त्यानुसार सॅनिटरी नॅपकिन पुरवठा करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी आता सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे. आयुक्त विक्रम कुमार त्यासंबंधीचा निर्णय घेणार आहेत, मात्र टेंडर प्रक्रियेवरील आरोप-प्रत्यारोप, तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थिनींना वेळेत सॅनिटरी नॅपकिन मिळण्यास आणखी विलंब होणार असल्याची सद्यःस्थिती आहे.
केंद्रीय भांडार विभागाकडून कमी दराचे टेंडरटेंडर प्रक्रियेवरून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे सॅनिटरी नॅपकिन पुरविण्याची जबाबदारी सरकारी संस्थेला देण्याचे सूतोवाच महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले होते. त्यानुसार टेंडर प्रक्रियेमध्ये केंद्र सरकारच्या केंद्रीय भांडार विभागाने टेंडर सादर केले आहे. त्यांनी सर्वाधिक कमी दराने टेंडर सादर केली आहे.महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींसाठीच्या सॅनिटरी नॅपकिनसाठीची टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली आहे. महापालिका आयुक्त त्यासंबंधी निर्णय घेणार आहेत. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर सॅनिटरी नॅपकिन पुरवठ्याची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यात येईल.- डॉ. चेतना केरुरे, उपायुक्त, सांस्कृतिक व भांडार विभाग, महापालिका
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज प्रतिनिधी )