हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आणि निवृत्त शिक्षणाधिकारी तुकाराम नामदेव सुपे याच्यासह सोलापूरचा निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि सांगलीचा निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.या तिन्ही अधिकार्यांकडे सुमारे 10 कोटींची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ‘एसीबी’ने एकाचवेळी तीन शिक्षण अधिकार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून दणका दिला आहे.
सुपे याने 1986 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत केलेल्या गैरव्यवहारांचे परीक्षण करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 2021 मध्ये पार पडलेल्या टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे याच्याविरुद्ध पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात सुपे याच्याकडून दोन कोटी 87 लाख 99 हजार 590 रुपये आणि 72 लाख रुपये किमतीचे 145 तोळे सोने, असा एकूण मिळून तीन कोटी 59 लाख 99 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सुपे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त म्हणून कार्यरत होता. त्यावेळी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यावेळी त्याने जमविलेली कोट्यवधी रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने मिळविल्याचे तपासातून निष्पन्न झाले. दरम्यान, 5 कोटी 85 लाख रुपयांची संपत्ती भ्रष्ट मार्गाने जमविल्याच्या आरोपावरून सोलापूरचा निलंबित शिक्षणाधिकारी किरण लोहार याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहार कुटुंबीयांच्या नावावर असलेली मालमत्ता त्यांनी बेकायदा जमविल्याचे तपासात उघडकीस आल्याने लोहार याची पत्नी सुजाता किरण लोहार (वय 44) आणि मुलगा निखिल (25, सर्व रा. प्लॉट नं. सी. 2, आकांक्षा शिक्षक कॉलनी, पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीचा निवृत्त शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे आणि त्याची पत्नी जयश्री (दोघेही रा. बारबोले प्लॉट, शिवाजीनगर, बार्शी)यांच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे याच्याकडे सुमारे 83 लाख रुपये किमतीची मालमत्ता सापडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक शीतल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
— गणेश मारुती जोशी (हिंदजागर न्युज, पुणे )