हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे : नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची ‘बीआरटी’ मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर आले आहे. ‘बीआरटी’ उपयुक्त असल्याने सुरुवातीपासून ती हटविण्यास ‘पीएमपी’चा विरोध होता. ‘बीआरटी’ मार्गामुळे बसचा वेग वाढल्याने प्रवासासाठी कमी वेळ लागत असल्याचे निरीक्षण ‘पीएमपी’ने नोंदविले होते. त्यामुळेच पालिकेने ‘गनिमी काव्या’द्वारे रात्रीच्या अंधारात ‘बीआरटी’ मार्गिका हटवली.
पुणे-नगर रस्त्यावरील येरवडा ते ‘आपले घर’ (खराडी) दरम्यान सात किलोमीटरची ‘बीआरटी’ मार्गिका आहे. नगर रस्त्यावरील मेट्रोच्या कामामुळे विमाननगर चौकापर्यंतचा ‘बीआरटी’ मार्ग सध्या बंद आहे. ‘बीआरटी’मध्ये होणारे अपघात, नगर रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी मार्गिका काढण्याची मागणी स्थानिक नागरिक श्री. बबन निकम यांनी केली होती
‘बीआरटी’चे काम करणारी महापालिका, बसचे संचलन करणारी ‘पीएमपी’ आणि वाहतूक व्यवस्थापन करणारे वाहतूक पोलिस या सर्वांची ‘बीआरटी’बाबत मतभिन्नता होती. या तिन्ही यंत्रणांच्या एकत्रित पाहणीतही एकवाक्यता नव्हती. त्यामुळे पालिकेने ‘बीआरटी’चा अभ्यास करण्यासाठी एका संस्थेची नेमणूक केली. संस्थेच्या अहवालानंतर ‘बीआरटी’ मार्गिका काढण्यास सुरुवात केली. मात्र, याची कोणतीही कल्पना ‘पीएमपी’ला दिली नाही.
पुणे-नगर रस्त्यावरील ‘बीआरटी’ मार्गातून १५४ बसच्या दररोज १९९० फेऱ्या होत असत. त्यामधून साधारणत: एक लाख आठ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याचे ऑक्टोबरमध्ये दिसून आले. त्यातून ‘पीएमपी’च्या तिजोरीत दररोज १८.४७ लाख रुपयांची भर पडत होती. ‘पीएमपी’चा शहरातील सर्वांत फायदेशीर ‘बीआरटी’ मार्गही हाच होता. मात्र, आता या मार्गावरील येरवडा ते वडगाव शेरी फाट्यादरम्यानची ‘बीआरटी’ काढण्यात येणार आहे. त्यामुळे फक्त पाच किलोमीटरची ‘बीआरटी’ उरणार आहे.’पीएमपी’च्या ‘बीआरटी’ मार्गांव्यतिरिक्त धावणाऱ्या बसचा सरासरी वेग ताशी १२ किलोमीटर आहे. ‘बीआरटी’ मार्गातून धावणाऱ्या बसचा वेग मात्र, ताशी २२ किलोमीटरपेक्षा जास्त आहे. याचा फायदा प्रवाशांना आणि ‘पीएमपीला’ही होत आहे. त्यामुळे ‘बीआरटी’ मार्ग असणे आवश्यक असल्याचे ‘पीएमपी’चे अधिकारी सांगत आहेत. दररोज ‘बीआरटी’तून सहा लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांच्याद्वारे मिळणारे उत्पन्न एकूण उत्पन्नाच्या निम्म्याहून अधिक आहे.
बीआरटी चालू ठेवावी अशी आमची मागणी आहे. या मार्गातून एसटी बस, स्कूल बस, औद्योगिक कंपन्यांच्या बस, रुग्णवाहिका यांना प्रवेश देण्यास हरकत नसल्याचे कळविण्यात आले होते. बीआरटी काढण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नव्हती.- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष, ‘पीएमपी’
— गणेश मारुती जोशी (हिंदीजागार न्युज पुणे )