हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – कोरोना विषाणूने पुन्हा एकदा भारतात एन्ट्री केली आहे देशात सर्वप्रथम ‘जेएन. १’ या ओमिक्राॅनच्या (काेराेना) व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर आता महाराष्ट्रातही एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४१ वर्षांच्या पुरुषालाही या व्हेरिएंटची लागण झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा टेन्शनचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागच्या काही दिवसांपासून २९२ प्रकरणे केरळमध्ये आढळून आले.नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिएंटवर संशोधन सुरु आहे. गोव्यामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर केरळ आणि महाराष्ट्रात देखील रुग्ण आढळला आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, जर कुणालाही सर्दी, खोकला, घसादुखी, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. श्वासोच्छवासाच्या समस्या आणि दमा असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी. तसेच मधुमेह (Diabetes) आणि हृदयाच्या संबंधीत आजार (Disease) असणाऱ्या लोकांनीही काळजी घ्यावी
केरळमध्ये सर्वप्रथम ७९ वर्षांच्या महिलेला या ‘जेएन.१’ विषाणूची लागण झाली हाेती. आता ती महिला पूर्णपणे बरी झाली आहे. ‘जेएन.१’ हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे या व्हेरियंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापि कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असे आराेग्य विभागाने म्हटले आहे.राज्यामध्ये नियमितपणे काेराेनाबाधितांचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनाेम सिक्वेन्सिंग) करण्यात येत आहे. सर्व लोकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व इतर कोविड योग्य वर्तन गरजेचे आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.
‘जेएन.१’ या कोविडच्या नव्या विषाणूबाबत काळजी घेण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. याबाबत काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधे घ्यावीत. याशिवाय कोविड संबंधित नियमावलीचे पालन करा.- तानाजी सावंत, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
भारत सरकारच्या सूचनेनुसार, कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील १२६४ सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील दिनांक १५ ते १७ डिसेंबरला करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हे, महापालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या महत्त्वपूर्ण मॉकड्रिलमध्ये सहभाग नोंदविला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयू, सुविधा, यंत्रसामग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडिसीनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला आहे, अशी माहिती आराेग्य खात्याने दिली आहे.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )