हिंदजागर न्युज प्रतिनिधी, पुणे – पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद सुरु असताना त्याठिकाणी एक अनोळखी तरुण आला. पत्रकारांप्रमाणे त्यानेही चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. चंद्रकांत पाटील यांच्या पत्रकार परिषदेत अनोळखी तरुण शिरल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या दरम्यान पाटील यांनी संबंधित तरुणाला बाजूला घेण्याची सूचना पाटील यांनी पोलिसांना केली.पाटील यांना संशय आल्याने त्यांनी संबंधित तरुणाला, ‘तुम्ही पत्रकार आहात का?’, असा प्रश्न विचारला. त्यावर तरुणाने नाही, असे उत्तर दिले. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी, ‘पत्रकार नसाल तर बाजूला व्हा’, असे तरुणाला म्हटले. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
या तरुणाचे नाव कुणाल असून त्याने वनविभागाशी संबंधित परीक्षेविषयी प्रश्न विचारला होता. अनेकदा परीक्षा देऊनही या तरुणाला नोकरी मिळू शकलेली नाही. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील यांना तरुणाने प्रश्न विचारला होता. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देणे स्पष्टपणे नाकारले. चंद्रकांत पाटील यांनी या तरुणाला बाजुला घेण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी (Pune) या तरुणाची चौकशी केली आणि नंतर त्याला सोडून दिले.
दरम्यान, भाजपच्या हेड मास्तर कडून आमदारांचे रिपोर्ट कार्ड मागविले आहेत. त्यामुळे अनेक आमदारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. त्यावर पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यातच हे रिपोर्ट कार्ड मागविण्यात आले आहेत.
— गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )