हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसले नगर या उच्चभ्रू परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी करणाऱ्या परराज्यातील आरोपीला तपास पथकाने अटक केली आहे.अटक केलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील 23 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे हिरेजडीत दागिने व रोख रक्कम जप्त केली आहे.नरेंद्र बाबु नुनसावत (वय-27 रा. आरटीसी कॉलनी कमान, टीकेआर कॉलेज इंदिरानगर, मीरपेठ, हैदराबाद, तेलंगणा) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसले नगर येथे दोन जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना चतु:श्रृंगी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. येरवडा व चतु:श्रृंगी पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करुन आरोपीला तेलंगणा राज्यातून अटक केली होती. आरोपीकडून चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले. पथकाने आरोपीच्या मुळ गावी जावून 23 लाख 20 हजार रुपयांचे सोन्याचे हिरेजडीत दागिने व रोख रक्कम जप्त केली.आरोपी नरेंद्र नुनसावत हा त्याच्या साथीदारासह परराज्यामध्ये जाऊन तेथील उच्चभ्रू परिसर शोधत होते.त्यानंतर ज्या घरांना स्लायडिंग विंडो आहेत, अशी घरे हेरुन त्या घरांमध्ये घरफोडी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहेत.
ही कामगिरी व कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके , पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, इरफान मोमीन,प्रदीप खरात, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के, सुधीर माने यांच्या पथकाने केली.
— श्री गणेश मारुती जोशी ( हिंदजागर न्यूज, पुणे )