हिंदजागर न्यूज प्रतिनिधी,पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व भारतीय जनता पक्ष नेत्यांच्या सातत्याने भेटीगाठी सुरू आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असून या भेटीगाठींचे निरनिराळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.मात्र, ठोस निर्णय काहीच होत नाही, त्यामुळे मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आता राज यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. तटस्थ राहू नये अशी बहुसंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे.
मनसे हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राज ठाकरे आमचे नेते आहेत. ते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. निवडणूक महत्त्वाची असतेच. मात्र, पक्ष त्यापेक्षाही महत्त्वाचा असतो. त्यामुळे राज घेतील त्या निर्णयाचे मनसैनिक पालन करतील. – राजेंद्र वागसकर, संपर्क नेते, मनसे
पुण्यात मनसेचे लक्षणीय संघटन आहे. महापालिकेत त्यांचे २९ नगरसेवक होते. त्यानंतरच्या पंचवार्षिकमध्ये ही संख्या एकदम २ झाली. मात्र, तरीही राज यांची पुण्यात क्रेझ आहे. प्रामुख्याने युवकांचा मोठा संच त्यांच्यामागे आहे. या सर्व कार्यकर्त्यांना निवडणुकीत रस आहे. त्यातही माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी तर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असल्याप्रमाणे काम सुरू केले आहे. संधी दिली, तर विजय नक्की मिळवू असे ते म्हणत असतात. भावी खासदार असे त्यांचे फलकही त्यांच्या कार्यकर्त्यांनी झळकावले आहेत.अशी तयारी सुरू असली तरी राज यांनी अद्याप काहीच आदेश वगैरे दिलेले नाहीत. यापूर्वीच्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांनी आमचे कार्यकर्ते तटस्थ राहतील अशी भूमिका घेतली होती. कार्यकर्त्यांनी मात्र काँग्रेसची उमेदवारी केलेले मनसेचेच जुने माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचे काम केले. त्यावरून मनसेने ५० जणांवर कारवाईही केली. मात्र, धंगेकर विजयी झाले व त्यानंतर सर्व गोष्टी मागे पडल्या. त्यामुळेच आपण कोणाबरोबर तरी राहायलाच हवे अशी मनसेच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची भावना आहे. तटस्थ राहणे सोडून तुम्ही कोणताही निर्णय घ्या, आम्ही त्याचे पालन करू असे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
भाजपच्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांना मनसे बरोबर हवी आहे. याचे कारण त्यांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली, की ती मतदारांच्या ठळकपणे लक्षात येते. त्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांवर परिणाम होतो, असे त्यांच्यातील काहींनी सांगितले. हिंदुत्व हा दोन्ही पक्षात समान धागा आहे, त्यामुळे एकत्र येण्यात काहीच अडचण नाही असे त्यांना वाटते. मात्र सातत्याने भेटीगाठीच होत आहेत, निर्णय काही होत नाही, आता त्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले.