हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – तळेगाव दाभाडे शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सहा जणांच्या टोळक्याने गुरुवारी (दि. २०) सायंकाळच्या वेळी चार ठिकाणी गोळीबार केला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१) सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहन उर्फ चिक्या उत्तम शिंदे (रा. शिवाजी चौक, तळेगाव स्टेशन), विकी खराडे आणि अन्य चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार आनंद मोहिते यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चिक्या शिंदे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून तळेगाव दाभाडे शहरातील गजानन चौक, शाळा चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक या ठिकाणी गोळीबार केला. आरोपींनी शहरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हा गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर सर्व आरोपी पसार झाले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलिस आयुक्त देविदास घेवारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावार, पोलिस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. गोळीबाराचा थरार रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज जमा केले आहे. त्यानुसार आरोपींचा माग काढला जात आहे. तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.