हिंदजागर न्यूज प्रतिनिधी, पुणे – अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या एका गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आढळल्याने या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पालवे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापूर्वी ३० मे रोजी प्रकाश भगवान आव्हाड आणि प्रसाद मोहन मोरे या दोघांवर भादंवि ४२०, ४६८, ४६५, नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सह दुय्यम निबंधक अमृता योगेश बनकर यांनी फिर्याद दिली होती.
मौजे वडगांव बुद्रुक येथील एका साडेचार गुंठे जागेवर बेकायदा बांधकाम करण्यात आले होते. या ठिकाणी हुशारे कॉम्प्लेक्स या नावाने इमारत बांधण्यात आली होती. या इमारतीमधील विविध सदानिकांच्या खरेदी विक्री संदर्भातील दस्त नोंदविण्यात आले होते. या व्यवहारात बनावट कागदपत्रे वापरण्यात आली होती. याबाबत एक तक्रार दाखल करण्यात आली होती.
या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये पुणे महापालिकेकडून अहवाल प्राप्त करून घेण्यात आला होता. या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या इमारतीसाठी गुंठेवारी नियमितीकर दाखला जोडण्यात आला होता. त्यांची पडताळणी करण्यात आली. मात्र, दाखल्याची कोणतीही नोंद पुणे महापालिकेच्या अभिलेखात आढळून आली नव्हती. हा नियमितीकरण दाखला बनावट असल्याचे तपासात आढळून आले. हा बनावट दाखला जोडून शासनाची फसवणूक करण्यात आल्याप्रकरणी प्रतिभा रियाल्टर्स तर्फे भागीदार आणि मान्यता देणार यांच्यातर्फे कुलमुखत्यार असलेले प्रकाश भगवान आव्हाड, प्रसाद मोहन मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.
याविषयी माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले, ”२०१८मध्ये दिनेश समुद्रे नावाच्या व्यक्तीवर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा तपासाकरिता पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे यांच्याकडे होता. दरम्यान, २०२० साली समुद्रे यांच्यावर ‘एमपीआयडी’ अन्वये कारवाई करण्यात आली होती. सोनवणे याचा भाचा मोरे आणि मेहुणा आव्हाड या दोघांनी समुद्रे यांच्यामुलासोबत भागीदारी केली. वडगाव बुद्रुक येथील जागेवर बांधण्यात येणाऱ्या इमारतीसाठी तयार करण्यात आलेल्या बांधकाम कंपनीत मोरे आणि आव्हाड यांनी भागीदारी घेतली. त्यानंतर दोन महिन्यांनी समुद्रे यांच्या मुलाने ही भागीदारी सोडली आणि त्याचे ‘रिटायरमेंट अॅग्रिमेंट’ केले. या गुन्ह्याच्या तपासात सोनवणे यानेच पालवेच्या मदतीने मोरे आणि आव्हाड यांच्यासाठी हा सर्व प्रकार केला असल्याचे समोर आले असल्याचे आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पुढील तपास अलंकार पोलिस करीत आहे.