हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – उत्खननातील माती वाहून नेणाऱ्या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच घेतल्याप्रकरणी बावधन वाहतूक विभागातील पोलिस अंमलदाराला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (दि.२७) बावधन वाहतूक पोलिस चौकीसमोर करण्यात आली. समाधान वालचंद लोखंडे (वय ३१, नेमणूक – बावधन वाहतूक विभाग) असे रंगेहात पकडलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय उद्योजकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा उत्खनन केलेली माती व इतर मटेरियल ने-आण करण्यासाठी माल वाहतूक गाड्यांचा व्यवसाय आहे. उत्खननातील माती वाहतूक करताना कोणत्याही गाडीवर कारवाई न करण्यासाठी प्रत्येक गाडीला एक हजार रुपये याप्रमाणे पाच गाड्यांचे पाच हजार रुपये देण्याची पोलिस अंमलदार समाधान लोखंडे यांनी मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा लावून पाच हजारांची लाच घेताना समाधान लोखंडे यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एसीबीचे पोलिस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत.
Repoter – गणेश मारुती जोशी .