हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – अंडी, चिकन, मटण यापासून होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रक्रिया प्रकल्प उभा करावा, अशा मागणीला यश आले असून, महापालिकेच्या उरळी येथील कचरा डेपोच्या जागेत हा प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. विधीमंडळात मी केलेल्या मागणीला यश आले, अशी प्रतिक्रिया आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) व्यक्त केली.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये औंध – बोपोडी परिसरात विक्रेत्यांची विविध मार्केट व हॉटेल्स आहेत. मटण, चिकन, अंडी याचा कचरा काही मटण, चिकन विक्रेते आणि नॉनव्हेज हॉटेलचे कर्मचारी मुळा नदीपात्रामध्ये टाकतात. त्यामुळे प्रदुषण निर्माण होऊन आरोग्यास धोका पोहोचतो. ही समस्या केवळ माझ्या शिवाजीनगर मतदारसंघापुरती नसून संपूर्ण शहराचीच आहे, याकडे विधानसभेत २०२३ साली लक्षवेधी सूचनेद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. अशी माहिती आमदार शिरोळे यांनी दिली.
चिकन, मटण, अंडी याचा कचरा पुणे शहरामध्ये दररोज जवळपास १० टन पर्यंत जमा होतो, असा अंदाज आहे. या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली गेली नाही, तर शहरामध्ये नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. याकडे शासनाचे लक्ष वेधले. पुणे महापालिकेकडे मोकळ्या जागा उपलब्ध आहेत, त्यावर प्रकल्प उभा करावा, अशी सूचनाही मी केली होती. या मागणीची पूर्तता झाली. चिकन, मटण, अंडी यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट प्रक्रिया प्रकल्पाद्वारे लावली जाणार आहे, ही स्वागतार्ह बाब आहे, असे शिरोळे यांनी म्हटले आहे.
Repoter – विनोद वाघमारे..