हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी, पुणे – राज्यात ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील भगिनींना तातडीने कागदपत्रे गोळा करण्याची गरज आहे.
सोमवार १ जुलैपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत असून,अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ ही आहे. मुदत संपल्यानंतर या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची पाळी येऊ शकते असे बोलल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यातील भगिनींनी गोळा करा कागदपत्रे, असा नारा गावागावातून दिला जात आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही, १ जुलैपासून अर्ज भरण्यास होणार प्रारंभ, १४ ऑगस्टला जमा होणार खात्यात पैसे माझी लाडकी बहीण योजना, महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १, ५०० रूपये इतकी रक्कम दिली जाईल. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६० वर्ष पूर्ण होईपर्यंतच्या महिलांना लाभ मिळेल.
सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे असे शासन परिपत्रकात नमूद केलेले आहे.
“असे आहे योजना अंमलबजावणीचे वेळापत्रक “
अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात १ जुलै, २०२४,अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक- १५ जुलै, २०२४, तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक १६ जुलै,२०२४, तात्पुरत्या यादीवरील तक्रार / हरकती प्राप्त करण्याचा कालावधी- १६ जुलै, २०२४ ते २० जुलै,२०२४, तक्रार/ हरकतींचे निराकरण करण्याचा कालावधी- २१ जुलै, २०२४ ते ३० जुलै, २०२४, अंतिम यादी प्रकाशन दिनांक- ०१ ऑगस्ट, २०२४, लाभार्थ्यांचे बँकेमध्ये इ-केवायसी करणे- १० ऑगस्ट, २०२४, लाभार्थी निधी हस्तांतरण- १४ ऑगस्ट, २०२४, त्यानंतरच्या महिन्यांत देय दिनांक- प्रत्येक महिनाच्या १५ तारखेपर्यंत.
” या कागदपत्रांची गरज “
उत्पन्नाचा दाखला सन २०२५ पर्यंत वैध असणारा असावा,जन्माचा दाखला,टि. सी झेरॉक्स,डोमेसाईल प्रमाणपत्र,रेशन कार्डची झेरॉक्स,आधार कार्ड,लाभार्थी नावाने बैंक पासबुक झेरॉक्स. तसेच केंद्र,राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १,५०० रूपये पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल.
राज्यातील २१ ते६० यावर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित,परित्यत्तत्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र राहतील.
कोणत्या महिला असणार पात्र ?
– महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
– विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
– वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
– अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक
– अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
– अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
– ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.
अर्ज भरण्याची सुविधा
अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्र व महा- इ- सेवा केंद्रे येथे पात्र महिलांना योजनेचा अर्ज भरता येणार आहे.
Repoter – गणेश जोशी