हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी समजली जाणाऱ्या पुणे शहरात व जिल्ह्यात आज पावसाने हाहाकार उडाल्याचं पाहायला मिळालं. मुसळधार पावसामुळे (Rain) सकाळपासूनच पुण्यातील विविध भागांत पाणी साचलं होत, तर काही भागांतील घरांमध्ये नागरिक अडकले होते.या भागात एनडीआरएफ व अग्निशमनच्या जवानांनी धाव घेत नागरिकांना घरातून बाहेर काढले. मात्र, आजच्या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांच्या डोळ्यातही पाणी तरळल्याचं पाहायला मिळालं. कारण, अनेकांच्या घरात पाणी शिरलं असून मोठं नुकसानही झालं आहे. पुण्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला, त्याच पार्श्वभूमीवर आज शाळांना सुट्टी देण्यात आली होती. आता, उद्या 26 जुलै रोजीही पावसाची शक्यता लक्षात घेत पुणे व पिंपरी चिंचवडमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, मुख्याध्यापक व शिक्षकांना शाळेत हजर राहावे लागणार आहे.
पुण्यात तब्बल 32 वर्षांनंतर एवढा मोठा पाऊस पडल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन, पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात उद्या शाळा, महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.ज्याअर्थी, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 25 जुलै 26 जुलै 2024 रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून पुणे जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माध्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा 26 जुलै 2024 रोजी बंद ठेवणे आवश्यक असल्याचे माझे मत आहे, असे म्हणत जिल्हाधिकारी यांनी पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडीमधील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
पुण्यातील खडकवासला धरणातून 40 हजार क्यूसेक विसर्ग सुरू होत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. याकरिता नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे या सर्व बाबींचा विचार करता भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचंही जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी म्हटलं आहे.
तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. तसेच उक्त आदेशाची अमंलबजावणी तात्काळ करण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
Repoter – गणेश मारुती जोशी.