हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील पाटील इस्टेट, पुलाची वाडी, खडकी, महादेववाडी, बोपोडी, खिलारे वस्ती यांसह आजूबाजूच्या भागात अतिवृष्टीमूळे आलेल्या पूराने घराघरांत पाणी शिरले.अशा पूरग्रस्त वसाहती जिथे असतील, तेथे तातडीने सरसकट पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.
पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरस्थिती व मदत कार्याबाबत सर्किट हाऊस येथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यामध्ये शिरोळे यांनी हा मुद्दा मांडला होता. याशिवाय जिथे पाणी शिरले, तेथे महापालिकेने तातडीने औषध फवारणी करावी. तसेच चिखल जमा झाला असेल तिथे साफसफाई करण्यात यावी, असे निर्देश देखील देण्यात आले आहेत. याशिवाय आरोग्य तपासणी व औषधे पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पावसामुळे व अन्य काही कारणांमळे वडारवाडी, गोखलेनगर, बोपोडी, औंध या भागात वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. महावितरणकडून नागरिकांना त्रास होत असून याबाबत देखील बैठकीत शिरोळे यांनी सांगितले. महावितरणचे अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. त्यावर देखील नागरिकांना त्वरीत प्रतिसाद देऊन आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले आहेत.
डेक्कन पुलाचीवाडी येथे विजेचा शॉक लागून मृत्यूमुखी पडलेल्या अभिषेक अजय घाणेकर (वय २४, रा. पुलाचीवाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (वय २१, रा. पूलाचीवाडी डेक्कन), शिवा जिदबहादुर परिहार (वय १९, रा. पुलाचीवाडी, डेक्कन, यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ लाख रुपयांची जाहीर केलेली आर्थिक मदत तातडीने द्यावी, असे निवेदन जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहे याबाबत सातत्याने पाठपुरावा छत्रपती शिवाजी नगरचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केला होता.