हिंदजागर न्यूज – ठाणे – बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मंगळवारी सकाळी संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला. तर दुसरीकडे आंदोलकांचा जमाव बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसला आहे. काहीवेळापूर्वीच बदलापूर स्थानकात आंदोलकांनी रेल्वे पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली होती. तर दुसरीकडे शाळेबाहेरील आंदोलकांनी पोलीस सुरक्षेचे कडे भेदत शाळेच्या आतमध्ये शिरत तोडफोड केली. यावेळी आंदोलकांनी पेट्रोल ओतून शाळेचे वर्ग पेटवून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा अनर्थ टळला. या प्रकारानंतर पहिल्यांदाच शाळेचे अध्यक्ष प्रसारमाध्यमांसमोर आले. मात्र, शाळेत घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना शाळेचे अध्यक्ष भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
शाळेच्या अध्यक्षांनी आंदोलकांना शांत होण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले की, गेल्या आठवड्यात शाळेत जी घटना घडली ती निंदनीय आणि घृणास्पद आहे. आम्ही पोलिसांना जास्तीत जास्त सहकार्य करत आहोत. प्रशासन आणि मुलीच्या पालकांनाही आम्ही सहकार्य करतोय. तसेच आमच्या शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित कशा करता येतील, याचा विचार करत आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की, तुम्ही कुठल्यातरी गोष्टीचा राग या शाळेवर काढू नका. तुम्ही पण याच शाळेत शिकला आहात, मी पण… हे वाक्य बोलताना शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला. यानंत त्यांना बोलता आले नाही आणि त्यांनी डोळ्याला रुमाल लावत तेथून काढता पाय घेतला
कोण आहे अक्षय शिंदे?
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत एकूण दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. यातील एक चिमुकली तीन वर्षे आठ महिन्यांची आहे. तर दुसरी चिमुकली ही सहा वर्षांची आहे. या दोन्ही मुलींनी आपल्या पालकांसमोर प्रायव्हेट पार्टला मुंग्या आल्यासारखं होतंय असं सांगितल्यावर संबंधित प्रकार उजेडात आला आहे. आरोपी अक्षय शिंदेने या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा केला जातोय. अक्षय शिंदे हा संबंधित नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. शाळेत स्वच्छता ठेवण्याची त्याच्यावर जबाबदारी होती.
आरोपी अक्षय शिंदेकडे काय जबाबदारी होती?
या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा संबंधित शाळेत सफाई कामगार होता. त्याचे वय 24 वर्षे आहे. त्याची नेमणूक ही सफाईसाठी नेमलेल्या कंपनीकडून केलेली होती. विशेष म्हणजे त्याला लहान मुलींना वॉशरूमला घेऊ जाण्याची जबाबदारी देण्यात आली. त्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे 14 ऑगस्ट रोजी उजेडात आले.
प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाणार
दरम्यान, या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्व प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले जाईल, असे राज्य सरकारने जाहीर केले आहे. सोबतच संबंधित शाळेने झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितलेली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केली असेल, तर पोलिसांवर कारवाई होईल. या प्रकरणात शाळा दोषी आढळल्यास शाळेच्या प्रशासनावरही कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे. तर आंदोलक अजूनही ठाम असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
लैंगिक अत्याचाराचा प्रकार कधी समोर आला?
दोन पीडित मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा प्रकार 14 ऑगस्ट रोजी समोर आला. यातील एका मुलीने आमच्या प्रायव्हेट पार्टजवळ त्रास होत असल्याचं आपल्या आजोबांना सांगितलं. असाच प्रकार माझ्या दुसऱ्या मैत्रिणीसोबतही होतोय, असंही या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी संबंधित दुसऱ्या मुलीच्या पालकांना कॉल केला, तर दुसरी मुलगीही शाळेत जाण्यासाठी तयार नसल्याचं त्यांना समजलं. या प्रकरणाच्या खोलात गेल्यानंतर या दोन्ही मुलीसोबत लैंगिक अत्याचार होत असल्याचे समोर आले.
Repoter – पी. संभाजी सूर्यवंशी .