हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे जिल्हा तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर तेलंग यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई शिवापूर (ता. भोर) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या रांझे तलाठी कार्यालयात बुधवारी (ता. २१) केली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेमुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.
सुधीर दत्तात्रय तेलंग (वय-५६ वर्ष, पद तलाठी, सजा रांझे, ता. भोर, जि. पुणे) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३१ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी रांझे गावात २० गुंठे जागा खरेदी केली आहे. सदर जागेचा ऑनलाईन फेरफार नोंद ग्राह्य धरण्यासाठी व ७/१२ उता-यावर नोंद करण्यासाठी तक्रारदार हे लोकसेवक तलाठी सुधीर तेलंग यांच्याकडे गेले होते. तेव्हा लोकसेवक सुधीर तेलंग यांनी प्रत्येक गुंठयास रुपये १ हजार रुपये प्रमाणे २० गुंठ्यासाठी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांच्याच्याकडून आरोपी लोकसेवक सुधीर तेलंग यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.
— पी. संभाजी सूर्यवंशी.