हिंदजागर न्यूज – P.C.M.C – विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यासह राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेला चिंचवड विधानसभा मतदार संघात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे.कारण याठिकाणी भाजपच्याच नेत्यांनी स्थानिक आमदाराच्या विरोधात दंड थोपाटल्याने मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या चिंचवड मतदारसंघाची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आमदार आहेत. त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याची पुन्हा इच्छा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भाजपचे शहाराध्यक्ष शंकर जगताप यांनीही मतदारसंघावर आपला दावा सांगितला आहे. यातच भाजपचे स्थानिक नेतेही त्यांच्यासोबत असल्याने अश्विनी जगताप मोठा निर्णय घेणार असल्याचे बोललं जात आहे. भाजपच्या २० माजी नगरसेवकांसह अश्विनी जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.
विधानसभा निवडणूकीवर शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू आहे. यांच्यातील वाद अनेकदा समोर आल्याचे दिसून आलं. यातच आता अश्विनी जगताप शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुक त्या तुतारी या चिन्हावर लढविणार असल्याचेही बोललं जात असून त्याला शरद पवार यांचाही होकार असल्याचं समजत आहे.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर मार्च २०२२ मध्ये चिंचवडमध्ये पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणूकीत भाजपने अश्विनी जगताप यांना उमेदवारी देत जागा आपल्याच ताब्यात ठेवली. मात्र त्याच दिवसापासून त्यांचे दिर शंकर जगताप आणि त्यांच्यात उमेदवारीवरून राजकीय खल झाला होता. आता आगामी विधानसभा निवडणूकीत शंकर जगताप यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यावरूनच अश्विनी जगताप यांनी मोठं पाऊल उचलल्याचे समजत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जगताप कुटुंबातील व्यक्तीच्या उमेदवारीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजत आहे. यातच शंकर जगताप यांच्यावर नाराज असलेल्या भाजपचे माजी २० नगरसेवक देखील शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. नुकतेच माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपच्या सदस्यसत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी शंकर जगताप यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. आता अश्विनी जगताप यांच्यासोबत मोठा गट बाहेर पडल्यास चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का असेल असे राजकीय तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.
Repoter – पी. संभाजी सूर्यवंशी.