हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा परतीचा प्रवास अनंत चतुर्थीच्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास मंडपातून सुरु झाला. हजारो भक्तांच्या साक्षीने बाप्पाने आपला परतीला प्रवास सुरु केला असून गुलाल, पुष्पवृष्टी करत राजा मार्गक्रमण करत आहे.मंगळवारी पहाटे पासूनच एकीकडे लालबागच्या राजाच्या निरोपाची तयारी सुरु असतानाच अचानक बाप्पाच्या पायावर आणून ठेवलेल्या एका चिठ्ठीने लालबाग आणि आबजूबाजूच्या परिसरात राजकीय चर्चांना उधाण आलं. या चिठ्ठीमधील मजकुरामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लालबागचा राजाची स्थापना होते त्या मतदारसंघातील आमदारकीचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण असेल याबद्दलच्या चर्चा सुरु झाल्यात. असं या चिठ्ठीत आहे तरी काय पाहूयात…
चिठ्ठीत काय लिहिलं आहे?
राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान होतो तो भाग शिवडी विधानसभा मतदारसंघात येतो. शिवडीचे विद्यमान आमदार हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी आहेत. मात्र लालबागच्या राजाने निरोप घ्यायच्या दिवशी त्याच्या पायावर आणून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये मात्र सुधीर साळवी यांचं नाव आगामी आमदार म्हणून पाहायला मिळू दे अशी इच्छा अज्ञाताने व्यक्त केली आहे. ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवडी विधानसभा 2024 आमदार सुधीर (भाऊ) साळवी’ असा मजकूर या चिठ्ठीत लिहिण्यात आला आहे. लालबागच्या राजाच्या पायाशी आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवली तर ती पूर्ण होते असा भक्तांचा समज आहे. त्यानुसारच ही राजकीय चिठ्ठी राजाच्या पायशी अगदी शेवटच्या दिवशी ठेवण्यात आल्याने येथील स्थानिक राजकारणामध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
चिठ्ठीत नाव असलेली व्यक्ती आहे तरी कोण?
अनंत चतुर्थीच्या दिवशी पहाटे सुधीर साळवी समर्थकांकडूनच ही चिठ्ठी लालबागच्या राज्याच्या पायाशी ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. सध्या शिवडीमधून अजय चौधरी आमदार आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर चौधरी ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले. आगामी निवडणुकीसाठी अजय चौधरींबरोबरच ठाकरेंच्या पक्षाकडून सुधीर साळवी देखील शिवडीतून लढण्यासाठी इच्छुक आहेत. सुधीर साळवी हे स्वत: लालबागचा राजा सार्वजनिक मंडळाचे सचिव असल्याने या भागात त्यांचा दबदबा असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं होतं तेव्हा सुधीर साळवीही उपस्थित होते. त्यामुळेच यंदाची उमेदवारी कोणाला दिली जाणार याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.
सध्या त्यांच्याकडे काय जबाबदारी?
सुधीर साळवी लालबागचा राजा मंडळाचे सचिव असण्याबरोबरच उद्धव ठाकरेंच्या पक्षासाठी शिवडी विधानसभा मतदारसंघात संकटक म्हणून तसेच दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात समन्वयक म्हणून काम करतात. त्यामुळेच त्यांना ठाकरे उमेदवारी देऊन मोठी जबाबदारी देणार की अजय चौधरींवरच पुन्हा विश्वास दाखवणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
मात्र लालबागचा राजाच्या चरणी अगदी शेवटच्या दिवशी ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या दोघांमध्ये तिकीटासाठी सुरु असलेली धुसपूस पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र या चिठ्ठीमुळे आता उमेदवारीसाठी कोणाचा विचार करायचा? कोणाला संधी द्यायची आणि कोणाला नाकारायची याचा निर्णय घेण्यासंदर्भातील उद्धव यांचं टेन्शन नक्कीच वाढलं असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात आहे.
Repoter – प्रदीप कांबळे.