हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – कोथरूड हा पुण्यातील महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा विधानसभा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि राज्य भारतीय जनता पक्षाचे वजनदार नेते आणि उच्चतंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील येथे वास्तव्यास आहेत.
मात्र, गेल्या काही वर्षांत कोथरूडच्या राजकीय रचनेत काही बदल होत असल्याचे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपले वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याने कोथरूड पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे या मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. कोथरूड मतदारसंघाचे विधानसभेतील प्रतिनिधी आणि राज्याच्या राजकारणातील पाटील यांच्या भूमिकेची विधानसभा मतदानावेळी कसोटी लागणार आहे. पाटील आजही मतदारसंघातील प्रबळ उमेदवार असले तरी यावेळी पक्षाने नवा चेहरा द्यावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. खरे पाहायला गेले तर मतदारसंघाशी अधिक नाते असलेले अमोल बालवडकर यांनी येथून निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. बालवडकर भाजपचे बाणेर-बालेवाडी भागातील माजी नगरसेवक असून शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. गेल्या काही दिवसांत संभाव्य उमेदवार किंवा प्रबळ दावेदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
बालवडकर इच्छुक असले तरी सध्या ते आपले पत्ते खुले करण्याच्या स्थितीत नाहीत. आपल्या उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल असे सांगताना मतदारसंघातील अनेक गृहनिर्माण संस्था आणि तेथील रहिवाशांची मी निवडणूक लढवावी अशी सूचना आहे. आता मी माझ्या सामाजिक कार्याचा पाया वाढवावा असे त्यांचे मत आहे. पक्षाचा एक छोटा कार्यकर्ता आणि या भागाचा नगरसेवक म्हणून मी निष्ठेने काम केले असल्याने पक्ष माझ्या उमेदवारीचा नक्कीच विचार करेल. सध्या मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, तसेच मी उमेदवारी दाखल करावी यासाठी कोणताही पक्ष माझ्या संपर्कात नाही. राजकारणात कोणत्याही गोष्टीची शक्यता किंवा पर्याय नाकारता येत नाहीत. सध्या तर मी एवढेच म्हणेन की कोथरूडमधून विधानसभा लढविण्याचा माझा निर्णय ठाम आहे.
पृथ्वीराज सुतार म्हणतात, राज्य आणि शहराची जी स्थिती आहे ती पाहता राज्यातील महायुती आणि मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदारांच्या भावना आहेत. भाजपने केवळ घोषणा करण्याचा धडाका लावला असला तरी जाहीर प्रकल्प पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. शहरातील मेट्रो असो, समान पाणी वाटप, एसटीपी अशा काही मोजक्या प्रकल्पांकडे नजर टाकली तरी कोथरूडकर भाजपला पुन्हा संधी देण्याची अजिबात शक्यता नाही. पुण्यातच नव्हे तर राज्यातही महायुतीला दणका बसणार असून पुढील मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा असणार यात शंका नाही.
शिवसेनेतर्फे निवडून आलेले माजी आमदार चंद्रकांत मोकाटेही इच्छुक असून त्यांच्या उमेदवारीचाही विचार शिवसेना करू शकते. मात्र, खात्रीशीर गोटातून मिळालेल्या माहितीनुसार बालवडकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली तर उद्धव ठाकरे गटाची शिवसेना बालवडकरांना उमेदवारी देऊ शकते. बालवडकर यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला असल्याने कोथरूडमध्ये ते शिवसेनेतर्फे निवडणूक मैदानात उतरले तर आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. गेल्या दशकात बालवडकर यांनी केलेल्या कामांमुळे त्यांच्या भागातील सोसायट्यांमधील मतदारांचा त्यांना मजबूत पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि बालवडकर यांच्यातील भाजप-शिवसेना निवडणूक चुरशीची होऊ शकते.
भाजपसमोरील आव्हाने आणि धोरण- चंद्रकांत पाटील यांनाच मैदानात उतरवायचे की नवा, वेगळा उमेदवार द्यावयाचा हा पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असेल. पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली तर त्यांची कामगिरी आणि मतदारांतील प्रतिमा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. पक्षाने नवा उमेदवार देण्याचा निर्णय घेतला तर पाटील आणि मेधा कुलकर्णी गटांशी समन्वय साधण्याचे आणि त्यांचे सहकार्य मिळवण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.
स्थानिक नेतृत्व आणि संपर्क- मतदार आणि मतदारसंघातील प्रश्नांची चांगली जाण असणाऱ्या उमेदवाराला प्रथम पसंती मिळेल. या मतदारसंघातील मतदार व्यापक राजकीय विचारसरणीला प्राधान्य देणारा आहे. तसेच आपला उमेदवार मतदारसंघ आणि समस्या सोडविण्यास प्राधान्य देणारा असावा याबद्दल मतदार जागरूक असल्याचे दिसते. येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांचे लक्ष कोथरूडकडे लागून राहिलेले असेल. बालेकिल्ला असला तरी पक्षातून आणि पक्षाबाहेरून भाजपला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. निवडणूक निकालात मतदारसंघातील राजकीय चित्राचे जसे स्पष्ट दर्शन होणार आहे, त्याचप्रमाणे पुणे आणि महाराष्ट्राचा राजकीय मूड काय आहे हेही दिसून येणार आहे.
Repoter – गणेश मारुती जोशी.