हिंदजागर न्यूज प्रतिनिधी – पुणे – पुण्यामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या भागात अशी प्रकरणे घडलेली समोर येत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या एका महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.महिलेने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.सोमनाथ लक्ष्मण बेनगुडे (वय 42, रा. तळेगाव दाभाडे) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी बेनगुडे हा हाउसकिपिंग सुपरवायझर म्हणून रुग्णालयात नेमणुकीस आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला नेहमीप्रमाणे (दि. 29 जून) रोजी कामावर गेल्या होत्या. त्या काम संपल्यानंतर रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली येत होत्या. घटनेच्या दिवशी त्यांना दुपारची पाळी लावण्यात आली होती. त्याचवेळी त्यांना आरोपी भेटला आणि त्याने सांगितलं की, रेडिएशन विभागात धूळ असून तिथे स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या आहेत. पीडित महिला रेडिएशन ओन्कोलॉजी विभागात स्वच्छता करण्यासाठी गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास आरोपी बेनगुडे तेथे पोहोचला. त्याने दरवाजा बंद करुन फिर्यादींना जबरदस्तीने चेंजिंगरूमध्ये ढकलत नेले. महिलेने विरोध केल्यानंतरदेखील आरोपीने बलात्कार केला. घडलेल्या प्रकारानंतर पीडित महिला घाबरुन रडू लागली. त्यावेळी आरोपी बेनगुडे याने याबाबत कोणाला काही सांगितलंस तर तुला कामावर राहू देणार नाही अशी धमकी दिली. यामुळे पीडित महिला घाबरुन घरी निघून गेली.
याबाबत पीडित महिलेने काही दिवसांनी रुग्णालयाच्या सिक्युरिटी मॅनेजरकडे तक्रार केली. मात्र, कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर पीडितेने चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित आरोपी सुपरवायझर सोमनाथ बेनगुडे याला अटक केली.
— गणेश मारुती जोशी.