हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – राजकारणात काहीही अशक्य नाही, त्या-त्या वेळच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय घेतले की उत्कर्ष होतोच असं म्हटलं जातं. शरद पवार हे त्यापैकी एक नाव. पवारांचं राजकारण संपलं असं म्हणता म्हणता त्यांचे विरोधक संपायची वेळ आली, पण पवार काही थांबत नाहीत.
पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकांशी संघर्ष केला, त्याचवेळी संवादाची दारेही खुली ठेवली. ज्या ठिकाणी टोकाचा संघर्ष केला त्या ठिकाणीही दार राहू द्या, किमान संवादाच्या फटी खुल्या राहतील याची खबरदारी घेतली. लोकसभेच्या निमित्ताने त्याची चांगली प्रचिती आली.
भोरच्या ज्या अनंतराव थोपटे यांच्याशी पवारांनी कायम संघर्ष केला त्यांची भेट घेऊन अगदी मोक्याच्या क्षणी राजकारण साधलं. त्यांच्या मुलाचा, संग्राम थोपटेंचा लोकसभेसाठी पाठिंबा सहजसाध्य केला. तशाच प्रकारची खेळी आताही, विधानसभेच्या तोंडावरही केल्याचं दिसतंय. देशाचं, राज्याचं राजकारण करत असताना पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये विशेष लक्ष दिल्याचं दिसतंय. त्याचाच एक भाग म्हणून आता एकेकाळचे काँग्रेसचे नेते, नंतर भाजपवासीय झालेले हर्षवर्धन पाटील यांना आपल्या पक्षात घेतलं.
इंदापुरातील मार्केट कमिटीच्या मैदानात हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हा सोहळा अनेक राजकीय अर्थांनी महत्त्वाचा आहे. पश्चिम महाराष्ट्राचं राजकारण ज्यांनी जवळून पाहिलंय त्यांच्यासाठी इंदापूरचे नेते स्व. शंकरराव पाटील हे नाव नवं नाही. महाराष्ट्रातही सहकार क्षेत्रात याच शंकरराव पाटलांचं नाव मोठं होतं. दोन वेळा खासदार, सहा टर्म आमदार, कट्टर काँग्रेसी अशी त्यांची ओळख.
बारामतीचे शरद पवार आणि इंदापूरचे शंकरराव पाटील एकाच विचारसरणीचे नेते. पण शंकरराव पाटलांना खुद्द शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दोनवेळा पराभूत केल्याचा इतिहास आहे. पाटील-पवार घराण्यात चार दशकांचा संघर्ष होता. प्रामुख्यानं लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रानं हा संघर्ष अनेक वेळा पाहिलाय.
राजकारणातले शरद पवारच बिग बॉस…
हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत असताना अनेक गौप्यस्फोट केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये होते. त्यांचा इंदापूर मतदारसंघ हा लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये मोडतो. हर्षवर्धन पाटलांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांना मदत करणं अपेक्षित होतं. पण इंदापुरातून महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंना 25 हजारांची आघाडी मिळाली.
इंदापूरच्या मताधिक्याची त्यावेळी फार काही चर्चा झाली नाही. पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करताना खुद्द हर्षवर्धन पाटलांनीच यावर मोठा खुलासा केला. लोकसभेत बारामतीमधून सुनेत्रा पवारांविरोधात सुप्रिया सुळेंना निवडून आणण्यात आपला अदृश्य सहभाग होता असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी केला. शरद पवार हेच राजकारणाचे बिग बॉस असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.आधी शंकरराव पाटलांशी संघर्ष आणि आता त्यांच्याच राजकीय वारशाला पक्षात घेऊन बळ देण्याचा प्रयत्न… राजकारणात कोणत्या वेळी काय खेळी करायची यामध्ये माहीर असलेल्या शरद पवारांच्या इंदापुरातील राजकारणाने आता एक वर्तुळ पूर्ण केल्याचं दिसतंय.
— पी. संभाजी सूर्यवंशी ..