हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील एच.एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी गेले आहेत. सकाळपासून उद्धव ठाकरे रुग्णालयात आहेत. काही वर्षांपूर्वी ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाली होती.अलीकडे त्यांना पुन्हा त्रास झाल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले, ठाकरेंच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी चाचण्या केल्या. या रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
अँजिओप्लास्टी म्हणजे काय?
अँजिओप्लास्टी एक अशी शस्त्रक्रिया आहे ज्याचा उपयोग करून ह्दयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉक झालेल्या धमन्या उघडण्यासाठी केला जातो. अँजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरीशिवाय हृदयाच्या स्नायूंमध्ये रक्त प्रवाह पुनर्संचयित करते. हृदय विकाराचा झटका येणं यांसारख्या आपातकालीन स्थितीत अँजिओप्लास्टी केली जाते. अँजियोप्लास्टीला परक्यूटेनियस कोरोनरी इंटरवेंशन (PCI) असेही म्हटले जाते.
हे करताना एक लांब, पातळ ट्यूब (कॅथेटर) रक्त वाहिन्यांमध्ये टाकली जाते आणि ब्लॉक आर्टरीज उघडल्या जातात. कॅथेटरच्या टोकाला एक छोटा फुगा असतो. जेव्हा कॅथेटर एखाद्या ठिकाणी ठेवला जातो तेव्हा धमन्याच्या संकुचित भागात हा फुगा फुगवला जातो. यामुळे धमन्याच्या काठाला असलेले प्लेक किंवा ब्लड क्लॉट दाबले जाते ज्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होण्यास मदत होते. अँजियोप्लास्टी केल्यानंतर डॉक्टर कॅथेटर बाहेर काढून टाकतात. ते ठिकाण झाकण्यासाठी एका पट्टीचा वापर केला जातो. यात सर्जिकल प्रक्रियेच्या तुलनेत कमी जोखिम असते.
—- अनुराग भालचंद्र साळुंखे.