हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या या योजनेवरून विरोधक चांगलंच टीकास्त्र डागत आहे. अशातच आज राज ठाकरे यांनी देखील लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरती असल्याचे म्हटले आहे.
‘लाडकी बहीण योजनेचे या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील. नंतर पैसे येणार नाही. जानेवारी फेब्रुवारीत राज्याकडे पगार द्यायला पैसे नसतील.’, असं वक्तव्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सडकून टीका केली. मुंबईतील गोरगाव येथे राज ठाकरे यांचा आज राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला. मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या टीकेवर बोलताना म्हणाले, ‘अनेक लोकं वल्गना करताय, अनेक लोकं सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल चुकीचं सांगताय, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक तेवढे सगळे पैसे बजेटमध्ये ठेवलेले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आताही चालत आहेत. नंतरही चालणार आहे आणि निवडणूक होऊन गेल्यानंतरही चालणार आहे. पाच वर्ष चालणार आहे’, असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
— विनोद वाघमारे.