हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – मुंबई – राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या आमदारांचा शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे.थोड्याच वेळात विधानभवनात या आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 7 जणांची यादी महायुतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे पाठवली होती. या सात जणांच्या नियुक्तीवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केले आहे.
महायुतीने राज्यपालांकडे नियुक्तीसाठी पाठवलेल्या नावांमध्ये भाजपकडून 3, शिवसेनेकडून 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 अशा एकूण 7 जणांची नावांचा समावेश आहे. यात भाजपच्या चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि बाबू सिंग राठोड, राष्ट्रवादीकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी, तर शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील यांचा समावेश आहे.
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा वाद हायकोर्टात प्रलंबित असतानाच आता 7 आमदारांच्या नियुक्तीचा वादही हायकोर्टात पोहचला. या आमदारांच्या शपथविधीला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका शिवसेना ठाकरे गटाने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. आधीचे प्रकरण प्रलंबित असताना नव्या 7 आमदारांची नियुक्ती करणे असंवैधानिक असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता.
याआधी देखील ठाकरे गटानं राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीला स्थगिती मिळवण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. तेव्हा भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल होते. तेव्हाही उच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तेच पुन्हा एकदा घडलं आहे. आताही हायकोर्टानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आमदारांचा शपथविधीतील अडथळा दूर झाला आहे. थोड्याच वेळात उपसभापती नीलम गोऱ्हे विधानभवनात या नवनियुक्त आमदारांना शपथ देणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची बहुप्रतीक्षित घोषणा आजच होणार आहे. आज दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू होईल.
— गणेश मारुती जोशी.