हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – आज महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. महायुतीकडून ७ जणांची राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून वर्णी लागली. यामध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड, पंकज छगन भुजबळ, इद्रिस नाईकवाडी, हेमंत पाटील, मनिषा कायंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
दरम्यान या निवडीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा सुर आहे. पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर यांना विधानपरिषदेवर संधी डावलल्याने शहर उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याची भूमिका मांडली आहे.दत्ता सागरे माध्यमांशी बोलताना म्हणाले,’ आज अचानकपणे राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेची निवडणूक जाहीर करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे उमेदवार जाहीर केले त्यामध्ये पुणे शहराचे धडाडीचे नेतृत्व असणाऱ्या दिपक मानकर यांना संधी द्यायला पाहीजे होती. परंतु तसे न करता ज्यांच्या घरात सतत आमदार, खासदार, मंत्री पद आहेत अशांनाच पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली आहे.
ज्यांच्या घरात आमदार, खासदार मंत्रिपद असणाऱ्यांना संधी : रामदास गाडे पाटील
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर करुन त्यांना सपथ देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनं दीपक मानकर यांना संधी द्यायला पाहिजे होती, असं रामदास गाडे पाटील म्हणाले. ज्यांच्या घरात सतत आमदार खासदार मंत्रिपद आहे, अशांनाच पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली आहे, असं रामदास गाडे पाटील म्हणाले.
मराठा समाजाला जाणून बुजून डावलण्याचा प्रकार समोर येत आहे. कायम मराठा समाजाच्या ताकदवर कार्यकर्त्यांना पक्षात दुय्यम भूमिकेत वागवलं जात असून एका विशिष्ट समाजाला कायम झुकतं माप दिल गेलंय, असं गाडे पाटील म्हणाले. मराठा समाजाचा पक्षात उद्रेक झाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याची पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल, याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी, असं रामदास गाडे पाटील म्हणाले. याशिवाय पक्षाच्या प्रमुखांकडे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवणार असल्याचं देखील पाटील यांनी म्हटलं.
अजित पवार यांचा सामाजिक समीकरणाचा प्रयत्न
अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद आल्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी प्रफुल पटेल यांना संधी दिली. त्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवर सुनेत्रा पवार आणि दुसऱ्या जागेवर नितीनकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मध्यंतरी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता विधानपरिषदेवर संधी देताना अजित पवार यांनी सामाजिक समीकरण साधल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेवर संधी देताना ओबीसी मतदारांना सोबत घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल. तर, इद्रिस नायकवडी यांना संधी देत मुस्लीम मतदार देखील आपल्यासोबत जोडण्याच्या दृष्टीनं हे पाऊल त्यांना फायदेशीर ठरणार आहे.
— गणेश मारुती जोशी.