हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी साठी भाजपची (BJP) दिल्लीत खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रातील 105 उमेदवारांबाबत केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.
2 दिवसांपूर्वी महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतही याबाबत चर्चा करण्यात आली होती. भाजपने 2019 च्या विधानसभेला जिंकलेल्या 100 पेक्षा आधिक जागांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहेत..
भाजपचं मायक्रो मॅनेजमेंट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातल्या सत्ताधारी भाजपने कंबर कसलीय. मायक्रो मॅनेजमेंटच्या (Micro Management) जोरावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय. त्याच्याच अनुषंगाने भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 60 ते 70 उमेदवारांची नावं असलेली पहिली यादी जाहीर होऊ शकते. यात अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश असू शकतो अशी माहिती सूत्रांनी झी24तासला दिली आहे. ज्या जागा निवडून येण्यासाठी कुठलीही अडचण नाही अशा सुरक्षित आणि निवडून येण्याची गॅरंटी असलेल्या मतदारसंघातल्या उमेदवारांची घोषणा होऊ शकते.
भाजपाच्या पहिल्या यादीत या नेत्यांची नावं?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा, नितेश राणे, संजय कुटे, संभाजी पाटील निलंगेकर, आशिष शेलार या नेत्यांचा या यादीत समावेश असू शकतो.. दिल्लीत भाजपच्या जागांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी खलबतं सुरु आहेत. त्यामुळे पुढील 48 तासात महाराष्ट्र भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
महायुतीचं जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला?
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार याची उत्सुकता निर्माण झालीय. महायुतीत भाजप मोठा भाऊ असला तरी भाजप नक्की किती जागा लढवणार याबाबत उत्सुकता आहे. विधानसभेला भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. महायुतीतल्या सूत्रांच्या माहितीनुसार जागावाटपात भाजप 158, शिवसेना 70 आणि राष्ट्रवादी 60 जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय
पुढच्या दोन दिवसांत महायुतीचे घटकपक्ष बैठक घेऊन जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करु असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी सांगितलंय. पण यावेळच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं निरीक्षण अजित पवार गटाचं आहे. बंडोबांची संख्या वाढल्यास पाडापाडी होण्याची शक्यता आहे. महायुती उमेदवार जाहीर करताना बंडखोरी होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं राष्ट्रवादीनं सांगितलंय.
—– गणेश मारुती जोशी.