हिंदजागर न्यूज, प्रतिनिधी – पुणे – भारतीय हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून परतला असल्याची मोठी घोषणा नुकतीच केली आहे. मात्र मान्सून परतला असला तरी देखील महाराष्ट्रात पावसाचे सावट कायमच आहे.गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्थानिक वातावरण तयार होऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.
या पावसामुळे शेतकरी बांधवांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रावर चक्रीवादळाचे सावट असल्याचे वृत्त हवामान खात्याकडून समोर आले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात दाना नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात या चक्रीवादळामुळे अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार होईल आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना पुन्हा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालच्या दक्षिण भागापासून ते दक्षिण हिंदुस्थानात खूपच मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे.
या भागात मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवन्यात आला आहे. आयएमडी मधील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरात तयार झालेले हे चक्रीवादळ 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर आदळण्याची दाट शक्यता आहे.
याचा फटका फक्त भारतालाच बसणार असे नाही तर या चक्रीवादळाचा परिणाम आपल्या देशासह शेजारील राष्ट्रांना देखील बसण्याची शक्यता आहे.
बांगलादेश आणि म्यानमारला सुद्धा या चक्रीवादळाचा फटका बसेल आणि यामुळे अतिवृष्टी सारखा पाऊस होईल असा अंदाज आहे. यामुळे या संबंधित भागांमधील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची विशेष काळजी या ठिकाणी घ्यावी लागणार आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने आज राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून या अनुषंगाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
—- प्रदीप कांबळे .